मुंबई : मराठी शाळांचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचे कारस्थान मुंबई महानगरपालिकेने रचले असून त्याकरता 30हून अधिक शाळा आंतरराष्ट्रीय करण्याचा घाट महानगरपालिकेने घातला आहे. महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातही त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. अशाप्रकारे तथाकथित आंतरराष्ट्रीय बोर्डांना मराठी शाळा जोडल्यानंतर त्या मराठी माध्यमाच राहतील याची खात्री महापालिकेला देता येणार नाही. आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळा जगात अनेक ठिकाणी त्या त्या भाषांमधल्या असतात. तसेही करण्याचे महापालिकेच्या धोरणात असल्याचे दिसत नाही, त्यामुळे एकंदरित मराठी भाषा संपविण्याचा विचार महापालिकेचा असल्याचे यातून दिसते, असे मी मराठी चळवळ समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी म्हटले आहे.