जळगाव। चोपडा तालुक्यातील धानोरा येथे जिल्हा परिषदेच्या केंद्रीय मराठी शाळेत चक्क दोन वर्षापासून खाजगी इंग्लिश मिडीयमची शाळा सुरु आहे. याबाबत शालेय व्यवस्थापन समिती सदस्या प्रतिभा ज्ञानेश्वर सोनवणे यांनी सर्व प्रकार उजेडात आणत याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. सदर शाळेची चौकशी करुन सोमवार पर्यंत अहवाल मागविला होता. त्या अनुषंगाने सोमवारी 17 रोजी सकाळी चोपडा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी व शिक्षण समिती सदस्य आदींनी शाळेला भेट देऊन चौकशी केली. चौकशीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आला आहे. तसेच तक्रारदार यांच्या समक्ष आज मंगळवारी 18 रोजी पुन्हा चौकशी केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी दिली. गेल्या दोन वर्षापासून एका खाजगी संस्था चालकांकडून इंग्लीश मिडीयमची शाळा उघडपणे सुरु होती.
1700 रुपये भाड्याने
मुख्याध्यापक व शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष यांच्या ठरावानुसार एका संस्थेत शिक्षक म्हणून तसेच काही राजकीय पुढार्यांना जिल्हा परिषदेची मराठी शाळा दरमहा 1700 रुपये प्रमाणे वर्षाला 20 हजार 400 प्रमाणे भाड्याने देण्यात आली. शाळा भाड्याने देवून संबंधीतांनी शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली आहे. याबाबत शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीच्या सदस्य प्रतिभा सोनवणे यांनी शिक्षणमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण सभापती यांच्याकडे तक्रार केली होती.
अहवालाकडे लक्ष लागुन
तक्रारीची दखल घेत गटशिक्षणाधिकारी यांच्यासह पदाधिकार्यांनी या शाळेच्या भोंगळ कारभाराची चौकशी केली. चौकशीअंती मुख्याध्यापक यांना गटशिक्षण अधिकार्यांनी पालकांना बोलविण्याचे सांगितले असता मुख्याध्यापक यांनी मराठी शाळेत खाजगी इंग्लिश मिडीयमची शाळा भरविणार्यांनाच चौकशीसाठी बोलविले. त्यामुळे तक्रारदार सोनवणे यांनी सीईओंशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, याबाबत आज पुन्हा समक्ष चौकशी करुन अहवाल मागविला आहे. तसेच शाळेच्या भोंगळ कारभाराचा अहवाल सीईओंकडे प्राप्त झाला असून याबाबत संबंधीतांवर कुठली कारवाई केली जाते याकडे गावकर्यांसह जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.