भुसावळ । मराठी साहित्याला देशव्यापी ओळख मिळवून देण्यात वि.वि. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा सिंहाचा वाटा आहे. वाचकांमध्ये अभिरूची निर्माण होण्यासाठी त्यांनी केेलेले प्रयत्न मराठीच्या विकासासाठी हातभार लावणारे होते. त्यामुळे मराठी साहित्यात कुसुमाग्रजांचे स्थान अजरामर राहिल, असे प्रतिपादन मराठी विभागाच्या प्रा.डॉ. आशालता महाजन यांनी येथे केले.
कुसूमाग्रज हे मानवतावादी लेखक
नाहाटा महाविद्यालयात आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम.व्ही. वायकोळे होत्या. प्रमुख वक्ते डॉ. आशालता महाजन यांनी कवि कुसूमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान या विषयावर माहिती देवून कुसूमाग्रज हे आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मानवतावादी लेखक असल्याचे सांगितले.
मराठी विभागप्रमुख डॉ. के.के. अहिरे यांनी प्रास्ताविकात मराठी भाषेचे महत्व सांगुन मराठी भाषा व साहित्य क्षेत्रात विद्यार्थ्यांना वाव असल्याचे सांगितले. डॉ. प्रकाश सपकाळे यांनी मराठी भाषेची उत्पत्ती सांगितली. मराठी विभागाने मराठी व्याकरणावर 50 प्रश्नांची बहुपर्यायी स्पर्धा परिक्षा आयोजित केली. त्यातील प्रथम रविना शिंदे, द्वितीय वैभव सोनवणे व तृतीय ऐश्वर्या बहुरूपे यांना व्याकरणाची पुस्तके देवून गौरव करण्यात आला. सुत्रसंचालन प्रा.समाधान पाटील यांनी तर आभार डॉ. जे.एफ. पाटील यांनी मानले.
बस आगारात कार्यक्रम
येथील बस आगारात आयोजित मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी के.नारखेडे विद्यालयातील उपशिक्षिका नलिनी बाविस्कर-वानखेडे यांनी अभिजात भाषा दर्जा मिळण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निकष मराठी भाषेने पूर्ण केलेले असतांनाही गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्वसामान्य मराठी जनतेने सर्वसमावेशक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे येथे सांगितले. अध्यक्षस्थानी आगारप्रमुख संदीप पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय यंत्र अभियंता पी.एस. वासकर, विभागीय भंडार अधिकारी रोहन पाटील, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक राकेश शिवदे, लेखा परिक्षक ए.एम. सोनवणे, एस.एस. सहारे, प्रविण टोके, शेखर धांडे, जी.एस. ठाकरे उपस्थित होते. प्रास्ताविक आगारप्रमुख संदीप पाटील यांनी मराठी भाषेचा दैनंदिन वापरात उपयोग करण्याचे सांगितले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन धर्मराज देवराज यांनी केले.
मराठी पुस्तकांचे वाटप
दरम्यान, सकाळच्या सत्रात बसस्थानकावर रांगोळी व ङ्गुलहारांनी स्थानक सजविण्यात आले होते. पाणीपुरवठा सभापती किरण कोलते यांच्या हस्ते विद्यार्थी प्रवाशांना मराठी भाषेची पुस्तके वाटप करण्यात आली. तसेच दिवसभर ध्वनीक्षेपकावरून मराठी राजभाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देण्यात येत होत्या.
खडसे महाविद्यालयात मुक्ताईनगर
येथील जी.जी. खडसे महाविद्यालयात सोमवार 27 रोजी कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.आर. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मराठी भाषा कशी संपन्न व समृध्द आहे हे उदाहरणादाखल स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेद्वारे मराठी विभागप्रमुख प्रा. सी.डी. खर्चे यांनी मराठी भाषा उगम, विकास व कवी कुसुमाग्रज यांचे वाङमयीन कार्य या विषयावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी विभागातील प्रा. डी.एन. बावस्कर यांनी केले तर आभार जयश्री जंगले या विद्यार्थीनीने मानले.