फैजपूर। मराठी भाषा ही सर्वदृष्ट्या संपन्न असून मराठीला सर्वोच्च स्थानी पोहचविण्यास संत संपदेचा वाटा महात्वाचा आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जयश्री नेमाडे यांनी केले. धनाजी नाना महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या डॉ. जयश्री नेमाडे होत्या तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी उपस्थित होते.
व्यक्तिमत्व विकासात भाषेचे महत्व
विभागप्रमुख डॉ. मनोहर सुरवाडे यांनी प्रास्ताविकातून मराठी भाषेचे महत्व प्रतिपादन करतांना भाषा कोणतीही असो ती संवादाचे प्रभावी साधन आहे. तिचा जपून वापर करावा. भाषा समजून घ्या मगच बोला. व्यक्तिमत्व विकासात भाषेचे महत्व अधिक असल्याचे सांगितले. प्राचार्या जयश्री नेमाडे यांनी मराठी साहित्याच्या आढाव्यात उत्पत्तीचा इतिहास कथन केला. त्यात ज्ञानेश्वरांपासून थेट इरावती कर्वे यांच्या साहित्याचा परामर्श घेतला. डॉ. नेमाडे यांनी आपल्या स्वरचित कविता ‘गर्व हरण’, ‘अपंग दिन’, ‘प्रितीला जर पंख असते’, ‘बालक दिन’, ‘शब्द सखी’ यांचे वाचन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी यांनी मनोगत व्यक्त केेले. याप्रसंगी डॉ. सिंधू भंगाळे, प्रा. सुजाता भंगाळे, प्रा. चंद्रशेखर भारंबे उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा.डॉ. शरद बिर्हाडे यांनी केेले तर आभार प्रा.डॉ. दिपक सुर्यवंशी यांनी मानले.