नागपूर : फेब्रुवारीत बडोद्यामध्ये होणार्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार, कथालेखक लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार साहित्यिक रवींद्र शोभणे यांचा 70 मतांनी पराभव केला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या पंचरंगी लढतीत देशमुख यांना 427 मते मिळाली तर शोभणे यांना 357 मते मिळाली.
पंचरंगी, अत्यंत चुरशीच्या निवडणुक
बडोदे येथे होणार्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह राजन खान, रवींद्र शोभणे, किशोर सानप, रवींद्र गुर्जर असे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. या पंचरंगी व अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख यांनी बाजी मारली. शनिवारी संध्याकाळी पाच वाजता मतदान पूर्ण झाल्यानंतर रविवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी पावणे दोनच्या सुमारास मतमोजणी पूर्ण झाली आणि देशमुख विजयी झाल्याचे निवडणूक अधिकार्यांनी घोषित केले. अध्यक्षपदासाठी लक्ष्मीकांत देशमुख, राजन खान, रवींद्र शोभणे, किशोर सानप, रवींद्र गुर्जर असे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
विदर्भ साहित्य संघाची मते विभागली
या निवडणुकीत मराठवाडा साहित्य परिषदेने लक्ष्मीकांत देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर शोभणे यांच्यामागे विदर्भ साहित्य संघ उभा होता. नागपुरातून डॉ. शोभणे आणि डॉ. किशोर सानप अशी दोन नावे असल्यामुळे विदर्भ साहित्य संघाची मते विभाजित झाली आणि त्याचा देशमुख यांना फायदा झाला.
26 पुस्तकांचे लेखन
ज्येष्ठ कादंबरीकार, कथालेखक व निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी साहित्यिक रवींद्र शोभणे यांचा 70 मतांनी पराभव केला. पंचरंगी लढतीत देशमुख यांना 427 मते मिळाली तर शोभणे यांना 357 मते मिळाली आहेत. सनदी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत असताना देशमुख यांनी सलोमी, ऑक्टोपस, अंधेरनगरी, हरवलेले बालपण, अग्निपथ, मृगतृष्णा अशा 26 पुस्तकांचे लेखन केले आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल देशमुख यांच्यावर साहित्यक्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मराठी ज्ञान, व्यवहार भाषा व्हावी
माझ्या संमेलनाध्यक्षपदाच्या वर्षभराच्या कार्यकाळात मी विशेष प्रयत्न करणार असून अभिजात मराठी हेच माझे पहिले लक्ष्य राहणार आहे, अशी प्रतिक्रिया लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली. देशमुख म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेत अभिजात मराठी भाषा समिती स्थापन करण्यात आली. मी लवकरच प्रा. रंगनाथ पठारे यांना भेटून चर्चा करणार असून त्यानंतर दिल्लीत पाठपुरावा सुरू करणार आहे. याविषयी प्रसंगी आंदोलनाचीही माझी तयारी आहे. मराठी ही ज्ञानभाषा व व्यवहार भाषा झाली पाहिजे, हा माझा आग्रह आहे. त्यासाठी बारावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करणे आवश्यक आहे.
एक कोटीच्या मागणीचे समर्थन
देशमुख म्हणाले, मराठी विद्यापीठाची मागणी जुनीच आहे. हे विद्यापीठ मराठीचे आद्यकवी मुंकुदराज स्वामींच्या अंबेजोगाई या गावी व्हावे, असाही एक मतप्रवाह आहे. पण, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. यासोबतच पैठणला संतपीठ व्हावे, यासाठी शासनाने तत्वत: मंजुरी दिली आहे. तो विषयही प्रलंबित आहे. याकडे मी संमेलनाध्यक्षाच्या पदावरून शासनाचे लक्ष वेधणार आहे. संमेलनाला पैसे देताना आपले राज्य सरकार खूप कद्रुपणा करीत आहे. आजच्या महागाईच्या काळात 25 लाखांच्या अनुदानात काहीच होत नाही. म्हणून साहित्य महामंडळ जी संमेलनसाठी एक कोटीची मागणी करीत आहे तिचे मी समर्थन करतो.