‘मरिजाना‘, ‘म्याऊ म्याऊ‘ बनली तरुणाईची गरज!

0

पुणे/पिंपरी-चिंचवड : पुणे व पिंपरी-चिंचवडमधील जवळपास 50 टक्के तरुणाईला विविध नशांचा विळखा बसला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. ही तरुणाई मादक द्रव्यांच्या आहारी गेली असून, मरिजाना, म्याऊ म्याऊ, केटामाईन, एलएसडी, गांजा, चरस, मार्फिन, मेफाड्रोन आदी अमलपर्दांथासाठी ही तरुणाई वाट्टेल ते करत असल्याची धक्कादायक बाबही निदर्शनास आली आहे. आता शाळा, महाविद्यालये सुरु झाली. त्यामुळे नजीकच्या काळात नशेचे हे लोण आटोक्यात आणण्यासाठी पोलिस यंत्रणेला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. अमलीपदार्थ विक्रीस आणणारे मोठे रॅकेटच शहरात सक्रीय असून, त्याद्वारे तरुणाईचे भवितव्य धोक्यात आणले जात आहे. या अनैतिक व्यवसायातून दरवर्षी अब्जावधी रुपयांची उलाढाल होत असून, मुंबई, गोवा या भागातून हे नशिले पदार्थ शहरात येतात, अशी माहिती ‘विशिष्ट सूत्राने‘ नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर दिली.

कशी मिळतात मादकद्रव्ये!
मादकद्रव्याच्या आहारी गेलेली तरुण व तरुणींची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे पालकवर्ग हादरून गेला असून, विविध व्यसनमुक्ती केंद्रात या तरुणाईवर उपचार सुरु आहे. या संदर्भात दैनिक जनशक्तिने एक स्टिंग ऑपरेशन हाती घेतले असता, अत्यंत धक्कादायक माहिती हाती आली. विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींसारखे दिसणारे मुले-मुली शहरात अमलीपदार्थ विकतात. त्यासाठी त्यांनी विशिष्ट कोडवर्ड तयार केलेला आहे. खास करून ही मुले-मुली शिवाजीनगर (झोपडपट्टी परिसर), नळ स्टॉप, रविवारपेठ, स्वारगेट, लुल्ला बाजार चौक, बंडगार्डन कॉलेजरोड येथे पाठीवर विद्यार्थ्यांसारखी बॅग असलेली असतात. शिवाय, शहरातील काही पानटपर्‍यांवरदेखील अमलीपदार्थ मिळतात. फक्त त्यासाठी विशिष्ट कोडवर्डमध्ये त्यांची मागणी करावी लागते.

अमलीपदार्थांची किंमत किती?
क्रिस्टल मेथाम्फेटामाईन नावाचे एक औषध अमलीपदार्थ म्हणून वापरले जाते. त्याची व त्यासारखे अन्न पदार्थांची किंमत सर्वात जास्त आहे. जवळपास हजार ते तीन हजार रुपये प्रतिग्रॅम दराने हा अमलीपदार्थ मिळतो. या शिवाय, एक मिलीग्रॅम एलएसडीमध्ये 15 थेंब अमलीपदार्थ तयार होतो. तो तब्बल 1800 रुपये दराने विकला जातो. गांजाचे एक पाकिट 100 ते 150 रुपये दराने मिळते. मरिजाना, म्याऊ म्याऊ ही तरुणाईला वेड करणारे नशिली पदार्थ 150 पासून ते हजार रुपयांपर्यंत मिळतात. या नशिल्या पदार्थांची सवय लागावी, यासाठी अमलीपदार्थांचे तस्कर पहिल्यांदा ती फुकट वाटतात. नंतर ती घेण्यासाठी तरुणवर्ग त्यांच्यामागे लागतात. शहरात अमलीपदार्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढले असून, पोलिसांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष दिसून आले आहे.

मनोरुग्णांना दिली जाणारी औषधी मुलींना!
मुलगी पटविण्याचे अनोखे फंडे आता मुलांनी वापरण्यास सुरुवात केली आहे. मनोरुग्णांना दिली जाणारी विशिष्टप्रकारची औषधी महाविद्यालयीन युवक-युवतींना चक्क विविध पदार्थांतून खाऊ घालत आहेत. ही औषधी या मुलांकडे येते कशी, हेदेखील मोठे गौडबंगाल आहे. त्यामुळे मुलींच्या मेंदूवर मानसिक परिणाम होतात व या मुली संबंधित मुलांच्या आहारी जातात, असा धक्कादायक प्रकारही विशिष्ट सूत्राने दैनिक जनशक्तिच्या कानावर घातला आहे. तथापि, याबाबतची सत्यता पडताळता आली नाही. शिवाय, नशिले पदार्थदेखील मुलींना दिले जात असून, त्या त्याच्या आहारी गेल्या की त्यांचे शारीरिक व लैंगिक शोषण तर होतेच; परंतु त्यांचे आर्थिक शोषणही होत असल्याची अत्यंत धक्कादायक माहितीही सूत्राने दिली.