मलकापूरच्या तेल व्यापार्‍याला चालकाने घातला गंडा : साडेचार लाखांची रोकड घेवून आरोपी भुसावळातून पसार

भुसावळ : तेल व्यावसायीकाच्या व्यवहाराची तब्बल चार लाख 35 हजारांची रक्कम घेवून धरणगावातील चालकाने पोबारा केल्याची घटना शहरात सोमवारी घडली. या प्रकरणी गजानन वसंत सुशीर (धरणगाव, ता.मलकापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पसार चालकाचा कसून शोध
तक्रारदार व तेल व्यावसायीक नितीन दिलीप नैनाणी (35, महाकाली रोड, मलकापूर, जि.बुलढाणा) यांनी भुसावळातील साईजीवन सुपर शॉपीचे संचालक निर्मल (पिंटू) कोठारी यांना तेल विक्री केल्याने त्यापोटी चार लाख 35 हजार रुपये घेणे होते व ही रक्कम आणण्यासाठी नैनाणी यांनी त्यांच्याकडील चालक गजानन सुशीर यास सांगितले होते. 30 मार्च रोजी चालक सुशीर हा जळगाव येथे तेलाच्या बरण्या पोहोचण्यासाठी निघाल्यानंतर त्याने कोठारी यांची भेट घेवून सायंकाळी पेमेंट नेणार असल्याचे सांगितले होते व पुढे तो जळगाव येथे मालाची डिलेव्हरीसाठी निघून गेला व रात्री जळगावच्या समर्थ इंण्डस्ट्रीजमधून प्लॅस्टीक बॉटल भरून पीकअप (एम.एच.28 बी.बी.3341) घेवून भुसावळात परतला. यानंतर कोठारी यांचे मॅनेजर गजानन राजेश चव्हाण यांच्याकडून चालकाने चार लाख 35 हजारांची रक्कम स्वीकारली व मालकास रक्कम मिळाल्याचे कळवले मात्र त्यानंतर रात्री 10.45 वाजता फोन बंद केला व चालक पैसे घेवून पसार झाला. या प्रकरणी आरोपी गजानन सुशीर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजारपेठ पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.