मलेशियाकडून हरल्याने भारताचे फायनलचे स्वप्न धुळीस

0

इपोह (मलेशिया) । 26 व्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत यजमान मलेशियाकडून भारताला 1-0 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह सलग दुसर्‍यांदा अंतिम फेरीत पोहोचण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. तिसर्‍या स्थानासाठी भारतीय संघाची लढत न्यूझीलंडविरुद्ध होईल. अन्य लढतीत बलाढय ऑस्ट्रेलियाला जपानकडून 3-2 असा तर ग्रेट ब्रिटनने न्यूझीलंडला 3-2 असे पराभूत केले.

सरस गुणांनुसार ऑस्ट्रेलिया व ग्रेट ब्रिटन यांच्यात अंतिम लढत होईल. शुक्रवारी झालेल्या साखळी फेरीत मलेशियाला 11 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण गोल नोंदवण्यात त्यांना अपयश आले. यानंतर पहिल्या सत्रात उभय संघातील पाटी 0-0 अशी कोरी राहिली. दुसर्‍या सत्रात मलेशियाच्या शाहरलि साबाहने 23 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा उठवताना भारतीय गोलरक्षक आकाश चिकटेला चकवत शानदार गोल नोंदवला. शिवाय, संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. तिसर्‍या सत्रात भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण मनदीप सिंगला गोल करण्यात अपयश आले.