मल्टिप्लेक्सकडून होतेय ग्राहकांची लूट

0

पुणे । मॉल, मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे यांच्याकडून पार्किंग शुल्कच्या नावाखाली ग्राहकांची सर्रास लूट चालू आहे. पार्किंग शुल्क हेच मुळात नियमबाह्य असून जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना ही सर्व व्यावसायिक आस्थापना 25, 40, 60 तर 80 रुपयांपर्यंत पार्किंग शुल्क आकारतात. याविरोधात तक्रार करण्यास गेल्यास महापालिका व पोलीस दोघेही एकमेकांकडे बोट दाखवून टोलवाटोलवी करीत आहेत.

महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार मॉल, मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे आदींना वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून देणे हे बंधनकारक आहे. यासाठी त्यांना बांधकाम विभागाअंतर्गत चटई निर्देशांक क्षेत्र वाढवून देण्यात येतो. सिनेमागृहांसाठी चार कार, 12 दुचाक्या आणि 8 सायकल, मल्टीप्लेक्स आणि मॉल्ससाठी 6 कार, 16 दुचाक्या, चार सायकल, तर अन्य व्यावसायिक संकुले यांना 1000 स्क्वेअर फूट म्हणजेच 3 कार, 6 दुचाक्या, आणि 6 सायकली आणि 5 टक्के व्हिजिटर कार पार्किंग इतकी जागा वाहनतळासाठी सोडणे बंधनकारक आहे. तसेच मॉल, मल्टिप्लेक्स व अन्य व्यापारी संकुले त्यांच्या सोयीप्रमाणे कितीही जागा वाहनतळासाठी उपलब्ध करून देऊ शकतात. त्यासाठी त्यांच्याकडून कोणताही अतिरिक्त चटई निर्देशांक दर आकारण्यात येत नाही, अशी माहिती, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी उघडकीस आणली आहे. त्यामुळे या नियमानुसार कोणत्याही व्यावसायिक संकुलांना ग्राहकांना देण्यात येणारी सशुल्क वाहनतळ सेवा बेकायदेशीर ठरते.

महापालिका, पोलिस प्रशासनाचे मौन
मुळात हा सार्वजनिक प्रकारे ग्राहकांची लूट करण्याचा प्रकार असल्यामुळे प्रशासनाने स्वतःहून कारवाई करायला हवी. सर्वसामान्य माणसाने यासाठी त्यावर का वेळ घालवावा, असे ट्विट पीएमसी केअर, आणि पुणे पोलिसांच्या अधिकृत ट्विटरवरून विचारला असता, याविषयावर अनेकांनी चर्चा केली. तरीही पीएमसी केअर आणि पोलीस प्रशासन यांनी याबाबत कोणतेही उत्तर न देता मौन बाळगले आहे. त्यामुळे मॉल, मल्टिप्लेक्स आदींकडून अद्याप किती दिवस ग्राहकांची अशीच पिळवणूक होणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

कोणावरही कारवाई नाही
शहरातील मॉल, मल्टिप्लेक्स यांच्याकडून बेकायदेशीररित्या ग्राहकांकडून 25, 40, 60 तर काही ठिकाणी 80 रुपयांपर्यंत पार्किंगचे शुल्क येते. मात्र, सशुल्क वाहनतळ सेवा नियमबाह्य असल्यास 2011 पासून अद्याप किती जणांवर कारवाई करण्यात आली आहे, या प्रफुल्ल सारडा यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना, याची आकडेवरी उपलब्ध नाही, अशी माहिती बांधकाम विभागाचे उपअभियंता बी. डी. मचले यांनी दिली आहे.

तक्रार नेमकी करायची कोठे?
प्रफुल्ल सारडा यांनी या प्रकरणी महापालिकेकडे तक्रार केली असता. त्यांना तुम्ही पोलिसांकडे तक्रार करा, असे उत्तर देण्यात आले. तर पोलीस हा प्रश्‍न आमच्या अधिकारात नाही, तुम्ही महापालिकेकडे तक्रार द्या, असे म्हणून अंग काढून घेतात. त्यामुळे आम्ही नेमके जायचे कोठे, असा प्रश्‍न प्रफुल्ल सारडा यांनी उपस्थित केला आहे.