मल्ल्याची कर्ज फेडण्याची इच्छा असती तर कधीच फेडले असते-एम.जे.अकबर

0

नवी दिल्ली-बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला कर्ज फेडण्याची इच्छा असती तर त्याच्याकडे यासाठी खूप वेळ होता असे परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर यांनी सांगितले आहे. पत्रकारांशी बोलताना एम.जे.अकबर यांनी हे विधान केले आहे.

विजय मल्ल्याने आता कर्ज फेडण्यासाठी संपत्ती विकण्याची तयारी दर्शवली आहे. यासंबंधी एम.जे.अकबर यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिले. विजय मल्ल्याने बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवलं असून, त्याला फरार घोषित करण्यात आलं आहे. यासंबंधी विजय मल्ल्याने ट्विटरच्या माध्यमातून भाष्य करत आपल्या कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय करण्यात आल्याचा आरोप केला.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्ज फेडण्यासाठी आपल्या कंपन्यांना १३,९०० कोटी रुपयांची संपत्ती विकण्याची परवानगी देण्यात यावी २२ जून रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात आपण अशी याचिका दाखल केली आहे अशी माहिती विजय मल्ल्याने मंगळवारी दिली. या बँकांनी त्याला थकबाकीदार म्हणून घोषित केले आहे. मल्ल्याने कर्नाटक उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेमध्ये ईडीने जप्त केलेली १,६००.४५ कोटींची स्थिर मालमत्ता, ७,६०९ कोटीचे शेअर्स, २१५ कोटीचे फिक्स डिपॉझिट, युनायटेड स्पिरिट लिमिटेडमधील २,८८८.१४ कोटीचे शेअर्स आणि अन्य मालमत्ता विकण्याची तयारी दर्शवली आहे.