नवी दिल्ली-भारतीय बँकांना 9 हजार कोटींपेक्षा जास्त पैसे बुडवून परदेशात फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत सोमवारी ब्रिटनच्या न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी सीबीआयचे संयुक्त संचालक ए साई मनोहर यांच्या नेतृत्वात सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाचे संयुक्त पथक रविवारी ब्रिटनला रवाना झाले आहे. यापूर्वी राकेश अस्थाना यांच्याकडे या प्रकरणाची जबाबदारी होती.
यापूर्वी शुक्रवारी भारताच्या सुप्रीम कोर्टाने विजय मल्ल्याला दणका देताना मालमत्ता जप्त करण्याच्या ईडीच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला. तर विजय मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने केंद्राला नोटीस बजावली आहे. यासंदर्भात कोर्टाने केंद्राचे मत मागवले आहे.