‘मल्हार हेल्प फेयर’ खान्देशातील पहिले सेवाभावी प्रदर्शन जानेवारीत

0

जळगाव । लाइफ इज ब्यूटीफूल फाऊंडेशन व मल्हार कम्युनिकेशन आयोजित गरजवंतांच्या चेहर्‍यावर कृतज्ञतेचे हास्य फुलविणार्‍या संस्थांचे प्रदर्शन मल्हार ‘हेल्प फेयर’ येत्या 19, 20 आणि 21 जानेवारी 2018 ला सागर पार्क येथे भरविण्यात येणार असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी व सेवाभावी क्षेत्रात कार्य करणार्‍या व आवड असणार्‍या व्यक्तींसोबत झालेल्या अनौपचारीक संवादातून घेण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद मल्हारा यांनी केले.

‘हेल्प मल्हार हेल्प गाइड’ चे अनावरण
सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या सेवाभावी संस्था आणि व्यक्तींची अद्ययावत माहिती असलेल्या ‘मल्हार हेल्पगाइड’च्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन मल्हारच्या मेहरूण तलावाजवळील कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे व उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या गाईडमध्ये शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणा-या संस्थांची विभागवार मांडणी करण्यात आली आहे. तसेच शासकीय योजना, मुंबई पुण्यामध्ये विविध आजारांवर वैद्यकीय मदत देणार्‍या संस्थाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

उपस्थितांना केले मार्गदर्शन
चर्चासत्रात मा. जिल्हाधिकारी साहेबांनी या प्रकल्पाला शासनास शक्य असेल ती सर्व मदत देण्याचे आश्‍वासन दिले. यातच गिरीश कुलकर्णी यांनी संस्थांचे मार्केटिंग कसे करावे आणि सेवानिवृत्त ज्येष्ठांना या सामाजिक कामासाठी जोडून घेण्याबाबत सूचना केल्या. विविध सेवाभावी विषयांची ट्रेनिंग हेल्प फेयरमध्ये देता येईल असेही सूचविण्यात आले. करीमभाई वगनीभाई यांनी हे प्रकल्प म्हणजे पुण्यपावन काम आहे आणि आपण सर्वतोपरी प्रयत्न करुन या सेवाभावी कार्याला यशस्वी करण्याविषयी आवाहन केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन यांनी मदत करण्यासाठी फक्त पैशांचीच गरज नसते काही तांत्रिक ज्ञान असलेले जाणकार आपल्या वेळेचेही दान देऊ शकतात असे मत व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
हेल्प फेयरच्या निमित्ताने झालेल्या अनौपचारिक बैठकीत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे, भरत अमळकर, सिद्धार्थ बाफना, प्रकाश चौबे, उदय महाजन, करीम सालार, गनी मेनन, डॉ रेखा महाजन, डॉ.प्रीती अग्रवाल, राजू नन्नवरे, डॉ. रवी हिराणी, अमर कुकरेजा, नंदू अडवाणी, चंद्रशेखर नेवे, गिरीश कुलकर्णी, डॉ.रितेश पाटील, अनिल जोशी, मनीष पात्रीकर, मनोहर पाटील, भालचंद्र पाटील, अमित जगताप, हार्दिक शाह, तनय मल्हारा आदी मान्यवर उपस्थीत होते.