मविप्रचा कार्यालयीन ताबा संचालकांनी घेतला

0

जळगाव । बहुचर्चित मराठा विद्या प्रसारक संस्थेचा भोईटे-पाटील गटाच्या एकमेकांविरुध्दच्या तक्रारींमुळे जिल्हापेठ पो.स्टेच्या पोलिस निरीक्षकांनी दोघांना प्रतिवादी करुन तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार यांच्याकडे सीआरपीसी कलम 145 प्रमाणे कारवाई वजा आदेश होण्याकरिता दिलेला प्रस्ताव तालुका दंडाधिकारी अमोल निकम यांनी फेटाळून लावला आहे. दरम्यान अधिकृत संचालक मंडळाच्या वतीने चेअरमन नरेंद्र भास्कर पाटील व सहकार्‍यांनी मविप्रच्या कार्यालयात जावून पुनश्‍च ताबा घेतला.

आदेशातील विवेचन व निष्कर्ष
नरेंद्र पाटील वगैरे 23 यांच्यातर्फे तर्फे वकिलांनी दि. 16/04/18 रोजी सदर प्रस्तावास लेखी हरकत घेतलेली आहे व त्यानुसार सदर प्रस्ताव हा कायद्यानुसार अपूर्ण स्वरुपाचा व चुकीचा असल्या कारणाने तो रद्द बातल करण्यात यावा अशी विनंती केलेली आहे. सादर केलेल्या कागदपत्रावरुन असे दिसून येते की, विवादीत शैक्षणिक संस्थेची निवडणूक दि. 10/05/2015 रोजी झालेली आहे. व नवीन संचालक मंडळ दि. 11/05/2015 रोजी निवडून आल्याचे घोषित झालेले आहे. संचालक मंडळांची यादी मा. जिल्हा उपनिबंधक, जळगाव यांचेकडून मागविण्यात आलेली होती. भोईटे गटाने या प्रकरणी उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल असलेल्या याचिका क्रमांक 9738/2016, तसेच नरेंद्र पाटील यांनी दाखल केलेली किमिनल याचिका क्रमांक 282/2018, प्रकरणी निर्णयाच्या प्रती सादर केलेल्या आहेत. तसेच भगवान बाबुराव पाटील व इतर यांनी याचिका क्रमांक 6909/2014 दाखल केलेल्या प्रकरणी संचालक, उच्च शिक्षण विभाग, पुणे यांनी ना. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञालेखाची प्रत देखील सादर केलेली आहे.

प्रतिज्ञालेखातील परिच्छेद 6 वरुन असे दिसून येते की, सदर शैक्षणिक संस्थेचे निवडणुकीनंतर दि. 15/05/2015 रोजी प्रसिध्द झालेल्या अधिसुचनेनुसार निवडून आलेल्या संचालक मंडळाचे अध्यक्षांना सदर संस्थेवर शासनातर्फे नियुक्त श्री, गाधेकर या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्षाकडून दि. 22/05/2015 रोजी नवनिर्वाचित अध्यक्ष नरेंद्र भास्कर पाटील यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आलेला आहे व त्याबाबत विविध शासकीय अधिकारी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिकारी, जिल्हाधिकारी सोा, पोलिस अधिक्षक साो. जि.प.जळगावचे अधिकारी व संस्थेमार्फत चालविले जाणारे सर्व महाविद्यालयाचे प्राचार्यांना व सर्व माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापकांना लेखी कळविलेले आहे. त्यामुळे वरील सर्व बाबीवरुन संस्थेच्या वरील नवनिर्वाचित संचालकांकडे म्हणजेच नरेंद्र पाटील गट यांचेकडे कायदेशीर प्रक्रियेद्वारे म्हणजेच दि. 11/05/2015 रोजी निवडून आलेल्या संचालक मंडळाचा ताबा संस्थेवर असल्याचे स्पष्ट होते. याउलट भोईटे गटाचा कोणत्याही प्रकारे सदर संस्थेशी संबंध येत नसल्याने निष्कारण वाद करीत आहे. तसेच ते कोणत्याही प्रकारे सदर संस्थेचे नियुक्त अथवा निवडून आलेले संचालक देखील नाहीत.

असा फेटाळला प्रस्ताव
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव यांचेकडून नवनिर्वाचित संचालक मंडळ यांची नावे प्राप्त झालेली दि. 15/05/2015 रोजीची निवडून आलेल्या संचालक मंडळाची अधिसुचना पाहिली असता. नरेंद्र पाटील गटाची नावे असल्यामुळे तसेच म. सहाय्यक धर्मदाय आयुक्त, जळगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2003 ते सन 2018 पावेतो फेरफार अर्ज वांदाकीत असून प्रलंबित आहेत. पोलिस निरीक्षक, जिल्हापेठ पो.स्टे. यांनी दिलेला प्रस्ताव हा वरील सर्व बाबींचा विचार करता दोषपुर्ण असल्याचे स्पष्ट होत असल्याने सदरचा प्रस्ताव काढून टाकण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. म्हणून पोलीस निरीक्षक, जिल्हापेठ पोलिस स्टेशन, जळगाव यांनी सि.आर.पी.सी.कलम 145 प्रमाणे कारवाई वजा आदेश होणे करीता दिलेला प्रस्ताव जा.क्रं. 634/2018 दि. 27/02/2018 चा फेटाळण्यात येत आहे.