जळगाव । जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था भोईटे गटाने ताब्यात घ्यावे यासाठी शासनाने बेकायदेशीर पत्र काढले आहे. तसेच पोलीस प्रशासन सहकार कायद्याद्वारे निवडून आलेल्या सभासदांना संस्थेचे कामकाज करण्यास मज्जाव करीत असल्याच्या निषेधार्थ नूतन मराठा बचाव कृती समितीच्यावतीने सोमवारी 16 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात आला. कोर्ट चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला सामाजिक व राजकीय विद्यार्थी संघटनांनी पाठींबा दिला. मविप्र संस्थेचा ताबा घेण्यावरुन संचालक मंडळाची निवडणूक होऊन तीन वर्ष उलटल्यानंतर नगरसेवक नरेंद्र पाटील, निलेश भोईटे गटात वाद सुरु आहे. प्रत्यक्ष निवडणूक जिंकून आलेल्या संचालक मंडळाला कामकाज करण्यास मज्जाव करण्यात येत असल्याच्या निषधार्थ मराठा समाजाच्यावतीने हा संघर्ष मोर्चा काढण्यात आला.
दोन निवेदने सादर
सकाळी 10 वाजता शिवतीर्थ मैदानापासून शासनाच्या निषेधार्थ मोर्चाला सुरुवात झाली. स्टेडियम, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. जिल्हाधिकार्यांना मोर्चेकर्यांनी दोन निवेदन दिली. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी एक तर दुसरे निवेदन जिल्हाधिकार्यांच्या अखत्यारीत येत असलेले प्रस्ताव रद्द करणे, खोटे गुन्हे मागे घेणे यासाठी देण्यात आले.
ताबा घेण्यावरुन वाद
लबाड, लांडग्यांची घुसखोरी थांबवा, नही चलेगी, नही चलेगी, तानाशाही नही चलेगी, पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो, मविप्र वाचवा, समाज वाचवा अशी घोषणाबाजी करीत सोमवारी हजारो मराठा बांधव, मविप्र संस्थेचे सभासद रस्त्यावर उतरले होते. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या निवडणुकीत मध्ये नरेंद्र पाटील यांच्या संचालक मंडळाचा विजय झाला होता. दरम्यान, शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांच्या सहीने असलेल्या पत्रावर भोईटे यांचे संचालक मंडळ निवडून आल्याचा उल्लेख आहे. यावरुन ताबा घेण्याबाबत वाद सुरु झाला आहे.
महिलांची विशेष उपस्थिती
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यासपीठावर मविप्रचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, संचालक अॅड.विजय पाटील, संजय पवार, हेमंतकुमार साळुंखे, प्रतिभा शिंदे, जि.प.सदस्य रविंद्र पाटील, विनायक देशमुख सचिन सोमवंशी, शिवराम पाटील, भिमराव मराठे, यांच्यासह इतरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. काळ्या फिती लावून समाजबांधावांनी यावेळी शासनाचा निषेध केला.