मसाकात दुसर्‍याही दिवशी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरुच

0

फैजपूर। गेल्या 17 महिन्यांपासूनचा थकीत पगार द्यावा, या मागणीसाठी मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी मंगळवार 30 रोजीपासून काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कर्मचार्‍यांनी प्रशासकीय इमारतीसमोर एकत्र येत आंदोलनास सुरुवात केली. कारखान्यातर्फे जोपर्यंत मागण्या पुर्ण करण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन असेच सुरु ठेवण्याचा निर्धार कर्मचार्‍यांनी केला आहे. त्यामुळे बुधवार 31 रोजी दुसर्‍या दिवशीही आंदोलन सुरुच होते.

कारखान्यातील व्यवस्थापन मंडळाने गाळपात खंड पडणार नाही, याची काळजी घेत कर्मचार्‍यांना थकीत पगार मिळावे, यादृष्टीने काही पावले उचलली. त्यात त्यांना यशही आले. मात्र, कामगारांची संपूर्ण देणी चुकती करणे शक्य झाले नाही. यामुळे गेल्या वर्षीदेखील कामगारांनी संप पुकारला होता. या आंदोलनात सामंजस्याने तोडगा निघून नुकताच संपलेला गाळप हंगाम यशस्वी झाला. मात्र, यानंतरही कामगारांची झोळी रिकामी असल्याने त्यांनी मंगळवारपासून पुन्हा काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

अगोदर पगार नंतर बोलणी
चेअरमन शरद महाजन, संचालक सुरेश पाटील यांनी कामगारांशी चर्चा केली. मात्र, मसाकाची आर्थिक स्थिती पाहता पगारासाठी नियोजन सुरु आहे. जिल्हा बँकेमार्फत मंजूर कर्ज रक्कम उचलीसाठी कागदपत्रांची पूर्तता होताच पगार अदा करण्यात येईल, अशी माहिती दिली. सन 2016-17 या आर्थिक वर्षात कारखान्याने कामगारांचे 12 पगार दिले आहेत. उर्वरित पगार देण्यासाठी संचालक सकारात्मक आहेत. मात्र, थकित पगार मिळाल्याशिवाय पुढील बोलणी नाही. आर्थिक कोंडीमुळे कौटुंबिक अडचणी आल्याचा पाढा कामगारांनी वाचला.