मसाका कामगारांसह सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे उपोषण सुटले

0

कारखाना सुरू होण्याची आशा : थकहमी व कर्ज मिळाल्यानंतर पगार व देणी देण्याचे चेअरमन यांचे लेखी आश्‍वासन

फैजपूर- मधुकर सहकारी साखर कारखान्यातील विद्यमान कामगारांनी थकीत वेतन व अन्य मागण्यासाठी गेल्या 20 दिवसांपासून सुरू केलेले ठिय्या आंदोलन तसेच दोन दिवसांपासून सेवानिवृत्त कामगारांनी परीवारासह सुरू केलेले आमरण उपोषण शुक्रवारी आंदोलनकर्ते व संचालक मंडळात झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आले. या चर्चेत शासनाची थकहमी व जिल्हा बँकेकडून पूर्व हंगामी कर्ज मिळाल्यावर कायम कामगारांचे चार पगार व अन्य देणी प्राधान्य क्रमाने देण्यात येईल, असे लेखी पत्र चेअरमन शरद महाजन यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

कारखानासाठी हितासाठी आंदोलन मागे
विद्यमान कामगारांनी कारखान्याच्या हितासाठी व शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये म्हणून आंदोलन मागे घेत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. दोघेही उपोषण मागे घेण्यात आल्याने कारखाना सुरू करण्याच्या हालचाली वेगाने सुरू होतील, असे चित्र निर्माण झाले आहे.1 सप्टेंबरपासून थकीत वेतनासाठी कामगारांनी थकीत वेतन व अन्य मागण्यासाठी कारखाना प्रवेशद्वारा समोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. 20 दिवसानंतर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन व संचालक तसेच कामगार संघटनेचे अध्यक्ष किरण चौधरी, सचिव सुनिल कोलते व पदाधिकरी यांच्यात चर्चा होऊन गुरुवारी रात्री आंदोलन मागे घेण्यात आले.

पंधरा महिन्यांच्या आत सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅज्युएटी मिळणार
गेल्या दोन दिवसांपासून सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅज्युएटी व अन्य मागण्यासांठी परीवारासह कारखाना प्रवेशद्वाराजवळच सुरू असलेले आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. शुक्रवारी दुपारी तीन वाजता सर्व संचालक मंडळाने उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली परंतु कुठलाही तोडगा पुन्हा चर्चेत तोडगा निघाल्याने चेअरमन शरद महाजन यांनी लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. या लेखी पत्रात ग्रॅज्युएटी व फायनल पगार बँकेकडून कर्ज मंजुरीनंतर सेवा निवृत्त कर्मचार्‍यांच्या क्रमानुसार देणी पगार 15 महिन्यांच्या आत 20 लाख देण्यात येतील, असे ठरले. या चर्चेला चेअरमन शरद महाजन, व्हा.चेअरमन भागवत पाटील व संचालक तसेच उपोषणकर्ते भानुदास पाटील व अन्य सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.