बारामती । बारामती तालुक्यातील महसूल विभागाच्या ताब्यातील वन जमिनीपैकी अतिक्रमणविरहीत क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात द्यायचे आहे. यासाठी महसूल व वनविभागाच्या अधिकार्यांनी एकत्रित सर्व्हे करून वन जमीन क्षेत्राच्या आकडेवारीचा ताळमेळ घेऊन प्रत्यक्षात कार्यवाही करण्याच्या सूचना तहसिलदार हनुमंत पाटील यांनी दिल्या. येथील तहसिल कार्यालयात महसूल विभागाच्या ताब्यातील वन जमिनी वनविभागाकडे हस्तांतरण करण्यासंबंधी बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहायक वनसंरक्षक वैभव भालेराव, निवासी नायब तहसिलदार रमेश पाटील, मंडल अधिकारी, तलाठी, भूमिअभिलेख व वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना
वनजमिनीचे संरक्षण तथा व्यवस्थापन करण्यासाठी महसूल विभागाच्या ताब्यात असलेली वन जमीन वन विभागाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया जलद पूर्ण करावयाची आहे. वनजमिनी हद्दीसंबंधी काही अडचण असल्यास भूमिअभिलेख विभागाकडून चर्तुसिमा निश्चित करून घ्यावी. वन जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात यावी, असे पाटील यांनी सांगितले. तालुक्यातील जैनकवाडी येथील महसूल विभागाच्या ताब्यात असलेली 2 हेक्टर 21 आर वन जमीन मंगळवारी (दि. 12) हस्तांतरीत करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.