महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना नकोय पालकमंत्रिपद; मुख्यमंत्र्यांना निर्णय कळविणार !

0

मुंबई : काल बुधवारी महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्र्यांना पालकमंत्री पद जाहीर करण्यात आले. यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. मात्र बाळासाहेब थोरात हे पालकमंत्री पद स्वीकारण्यास तयार नाही. त्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी नको आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज गुरुवारी भेट घेऊन बाळासाहेब थोरात आपला निर्णय कळवणार आहेत.

कोल्हापुरातील कागल मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले आमदार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अहमदनगरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद द्यावे आणि आपल्याऐवजी काँग्रेसमधील एखाद्या सहकाऱ्याला अहमदनगरचे पालकमंत्रिपद द्यावे, अशी विनंती थोरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करणार आहे असे बोलले जात आहे. सहकार, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे एकाही जिल्ह्याचे पालकमंत्री पद नाही. त्यामुळे अहमदनगरचे पालकमंत्रिपद कदम यांना मिळण्याची शक्यता आहे.