महसूल मिळाल्यानंतर काटेरी झाडे काढणार का?

0

पुणे-नगर महामार्गावरील दुभाजकावर बोरीची झाडे; नागरिकांचा खोचक सवाल

वाघोली : वाघोली येथे पुणे-नगर महामार्गावरील दुभाजकावर मोठमोठी काटेरी झुडपे वाढली असून वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अचानक काटेरी झुडूप समोर आल्यानंतर वाहनचालक गडबडतो आणि झुडूप टाळण्याच्या नादात मागून भरधाव वेगाने येणार्‍या वाहनांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीन असल्यामुळे दुभाजकावर मोठ्या प्रमाणात असलेल्या बोरांच्या झाडांपासून विभागाला महसूल मिळणार असल्याची उपहासात्मक टीका नागरिकांमधून केली जात आहे.

दुर्घटनेनंतर जाग येणार का?

पुणे-नगर महामर्गावर वाहनचालकांसह नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दुभाजकावर वाढलेली बोरीचे काटेरी झुडपे नव्हे झाडे, खचलेल्या साइड पट्ट्या, महामार्गावर मध्यभागी असलेले मोठ-मोठे खड्डे, वाहतुकीला अडथळा ठरणारे विद्युत खांब, दुभाजाकावरील काटेरी झुडपांसह विविध जाहिरातींचे फ्लेक्स यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डा, झुडूप चुकवताना जीव धोक्यात घालावा लागत आहे. अशावेळी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उदासीन असलेला बांधकाम विभाग दुर्घटना घडल्यावर जागे होणार का? असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

हदारीस होतो अडथळा

पुणे-नगर महामार्गावरील दुभाजकावर वाढलेली बोरीचे झुडपे वेळीच काढणे गरजेचे होते. ती झाडे वेळेत काढले नसल्याने या झुडपांची मोठ्याप्रमाणावर वाढ झाली असून रहदारीस अडथळा ठरत आहेत. बोरांच्या झाडाला आता बोरही लागत असल्यामुळे यामधून संबंधित विभागाला महसूल मिळाल्यानंतर ही झाडे काढले जातील का? असा टोलाही स्थानिकाने लगावला आहे.