नंदुरबार । नंदुरबार येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सातपुडा महाआरोग्य शिबिरांतर्गत पहिल्या टप्प्यातील लहान शस्त्रक्रिया नंदुरबार सामान्य रुग्णालय व तळोदा उपजिल्हा रुग्णालयात सुरू झाल्या आहेत. या शस्त्रक्रियांसाठी पुणे येथील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयातील एकूण 22 तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक सामान्य रुग्णालय, नंदुरबार येथे दाखल झाले आहे. त्यात बधिरीकरणाचे 6 डॉक्टर, 7 सर्जन, 8 कान- नाक- घसा तज्ज्ञ, उपजिल्हा रुग्णालय, तळोदा येथे श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथील 9 डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. त्यात 2 सर्जन, 3 कान, नाक, घसा तज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ, 1 मेडिसीन यांचा समावेश असणार आहे.
126 कर्ण यंत्रे, 56 रेडिओलॉजी तपासण्या
प्रथम टप्प्यात नंदुरबार शहर व तालुक्यातील 277 सामान्य शस्त्रक्रिया व 75 कान, नाक, घसा संबंधित रुग्णांना संदर्भित करण्यात आले आहे. तसेच तळोदा व धडगाव येथील 233 शस्त्रक्रिया, 44 कान, नाक, घसा संबंधित रुग्ण संदर्भित करण्यात आले आहेत. यातील रुग्णांची शस्त्रक्रिया पूर्व तपासणी करण्यात येत असून त्यानुसार शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यात दुपारच्या सत्रापर्यंत नंदुरबार येथे 17, तर तळोदा येथे 14 शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. या शिबिरातील काही रुग्णांना धुळे येथील शासकीय व खासगी रुग्णालयात संदर्भित करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यांतर्गत हृदय रोगाची 44, अस्थिव्यंगची 124, मेंदू रोगाची 14, मूत्र रोगाची 23, प्लास्टिक सर्जरीची 26, लहान मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी 7 जणांना संदर्भित करण्यात आले होते. तसेच 126 कर्ण यंत्रे, 56 रेडिओलॉजी तपासण्या यात करण्यात आल्या. धुळे येथील निरामय, सिध्देश्वर, देवरे, सुधा, सेवा हॉस्पिटल, युरोलॉजी सेंटरद्वारे सदर रुग्णांना मोफत सेवा पुरविण्यात येत असून रुग्णांच्या भोजनाची व वाहतुकीची व्यवस्था करण्यात येत आहे.