मुंबई- आज देशभरात मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणेशभक्त आज आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत करत असून त्याच्याकडे प्रार्थना करत आहेत. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील गणरायाला साकदे घातले आहे. देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली असून ‘महागाईच्या डायनाला’ नष्ट करण्याची प्रार्थना उद्धव ठाकरे यांनी गणरायाकडे केली आहे.
बुद्धीची देवता असलेले गणपती राज्यकर्त्यांना जबाबदारी न झटकण्याची सुबुद्धी देतील, अशी अपेक्षा देखी त्यांनी व्यक्त केली आहे. 2014 मध्ये ज्यांना निवडून दिले त्यांच्याच काळात ही ‘डायन’ पुन्हा जनतेच्या बोकांडी बसली आहे. त्यात रोजच्या इंधन दरवाढीचा मारही सोसावा लागत आहे. पुन्हा ज्यांनी ही दरवाढ नियंत्रणात ठेवायची, तेच तेलाच्या जागतिक बाजारपेठेकडे बोट दाखवीत आपली जबाबदारी ढकलत आहेत. त्यामुळे महागाईचे विघ्न दूर कर आणि आमचे जगणे सुसह्य कर असे साकडे थेट विघ्नहर्त्या गणरायांनाच घालावे लागेल असे उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.
सरकार म्हणून बसलेले जेव्हा कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडण्यात कमी पडतात तेव्हा स्वतःच स्वतःला सावरण्याशिवाय सामान्य जनतेसमोर पर्याय नसतो. किंबहुना, तोच मार्ग जनता स्वीकारते. म्हणूनच महागाईचा प्रचंड आगडोंब उसळलेला असतानाही गणेशोत्सवाची लगबग, उत्साह, धामधूम कमी झाली नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
देशाची सुरक्षा, सीमेवरील अशांतता, सामाजिक अस्वस्थता, नोटाबंदी आणि जीएसटीच्या तडाख्यातून न सावरलेली अर्थव्यवस्था, रोजगार निर्मितीचे राज्यकर्त्यांचे पोकळ दावे, शेतकरी आत्महत्या आणि फसलेली कर्जमाफी, सत्ताधारी आमदारच मुली पळवून नेण्याची जाहीर भाषा करीत असल्याने राज्यातील महिला वर्गात पसरलेली भीती अशी इतरही विघ्ने आहेतच. ती दूर करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची असते. मात्र त्याऐवजी काखा वर करून जनतेला फुफाट्यात लोटले जात आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.