महाड: रायगड जिल्ह्यातील महाड येथील काजळपुरामध्ये काल एक इमारत कोसळली. या इमारत दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण जखमी आहेत. तीन माजली इमारत पूर्णत: जमीनदोस्त झाली. पाच वर्षापूर्वीच या इमारतीचे बांधकाम झाले होते. काही महिन्यातच या इमारतीला तडे गेले होते. त्यानंतर याबाबत वारंवार तक्रार करण्यात आली. मात्र याची दखल घेतली गेली नाही. अखेर ही इमारत कोसळली. यात जीवित हानी झाली. दरम्यान इमारत दुर्घटनेतील पाच दोषींवर महाड शहर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही. आरोपींच्या शोधासाठी पथक विविध भागांमध्ये तैनात करण्यात आले आहे.
बिल्डर फारुक काझी, आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे, वास्तू विशारद गौरव शहा, तत्कालीन मुख्याधिकारी दिपक जिंजाड, तत्कालीन अभियंता शशिकांत दिघे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. दरम्यान, इमारत दुर्घटनेची कोकण विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर पालिकेचे अधिकारी यांची एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे.