महात्मा फुलेंच्या पगडीला विरोध असल्याचे शिवसेनेने जाहीर करावे

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
राज्यात सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक जी विषमता आहे ती दुर करण्याचा आमचा कार्यक्रम

मुंबई :- महात्मा फुले यांची पगडी ही समतावादी विचारधारेची आहे. समाजातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विषमता दुर करणारा हा विचार आहे त्याला विरोध करण्याचे कारण काय असा सवाल करत महात्मा फुलेंच्या पगडीला विरोध असल्याचे शिवसेनेने जाहीर करावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहे. बुधवारी सामनामध्ये आलेल्या पगडी बाबतच्या अग्रलेखातील राजकारणावर नवाब मलिक यांनी मिडियाशी बोलताना शिवसेनेला प्रतित्युत्तर देताना जाहीर आव्हान दिले आहे.

सामनामधून ज्याप्रकारे टिका होते आहे आणि गेले चार दिवस या पगडीवर सगळं राजकारण सुरु आहे. शरद पवारसाहेबांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची पगडीचा वापर करा असा आदेश दिलेला आहे. आमचा पक्ष शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी चालणार आहे आणि या विचाराला काही लोक घाबरत आहेत ती प्रतिगामी शक्ती आहे. समतामुलक समाज निर्माण झाला पाहिजे. मागासवर्गीयांना,ओबीसींना,समाजातील खालच्या थरातील लोकांना शक्ती मिळाली पाहिजे. परंतु त्यांना हे मान्य नाही.ते लोक गेले चार दिवस घाबरलेले आहेत असेही नवाब मलिक म्हणाले.

आम्ही समतामुलक समाज, समतावादी विचारधारा राज्यात सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक जी विषमता आहे ती दुर करण्याचा आमचा कार्यक्रम असल्याचे स्पष्ट केले. महात्मा फुले यांची नुसती पगडी नाही तर ही विचारांचे प्रतिक आहे. ज्यांना हा विचार पटत नाही ते या विचाराला घाबरत आहेत आणि त्याच्यावर टिका, चर्चा करत आहेत. त्यांचे विचार मांडत आहेत. मात्र आमचे विचार स्पष्ट आहेत. महात्मा फुले यांची पगडी नुसती पगडी नाही तर समतावादी विचार आहे. त्यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधिलकी असल्याची भूमिका नवाब मलिक यांनी स्पष्ट केली. शिवसेनेचा मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला विरोध, महिला आरक्षणाला विरोध, मात्र ते सांगत आहेत जातीभेद ठेवायचा नाही. हे शिवसेनेचे बेगडी विचार आहेत. शिवसेनेचे सावरकरांचे विचार असतील, त्यांचा संघाच्या विचारांशी यांचा मेळ खात असतील त्यांना कधीही महात्मा फुलेंचे समतावादी विचार पटणार नाहीत असे सांगतानाच शाहु,फुले,आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा आमचा पक्ष आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले. ज्यांना सावरकरांचे विचार चालवायचे असतील तर त्यांनी चालवावे. हे इतके पगडीला का घाबरत आहे. पगडीमुळे सगळे विचलीत का झाले आहेत असा सवालही केला. काही लोक सांगत आहेत की ही पेशवाईची पगडी आहे. ज्यांना जे अर्थ काढायचे असतील तर ते काढू देत.आम्ही त्या पगडीबद्दल काही बोलत नाही असेही नवाब मलिक म्हणाले.