महात्मा फुले महामंडळ अपहार प्रकरण : आर्थिक गुन्हे शाखेकडून एकाला अटक !

Suspect in Bhusawal arrested in Mahatma Phule Corporation embezzlement case भुसावळ : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजनेत कोट्यवधींच्या अपहार प्रकरणा जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने भुसावळातील विनोद निकम या संशयीतीला अटक केलीआहे. आर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.

अपहार प्रकरणी दाखल आहे गुन्हा
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून अर्थसहाय्य घेताना बोगस लाभार्थी दाखवून महामंडळ व बँकेच्या अधिकार्‍यांनी साडेतीन कोटी रुपयांचा अपहार केला होता. शेकडो बोगस लाभार्थी दाखविण्यात आले होते. यात महामंडळ व बँकांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह एजंट आदींचा समावेश होता. २०१६ ते २०१८ या कालावधीत हा अपहार झाला होता. याप्रकरणी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अधिकार्‍याने तक्रार दिल्यानंतर रामानंद आणि जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. यात बँकेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी दलालांना हाताशी धरुन एकाचा फोटो दुसर्‍याच्या आधार कार्डवर, पत्ता तिसर्‍याचाच अशा प्रकारची शेकडो बोगस प्रकरणे तयार करून बीज भांडवल योजनेंतर्गत कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.

जळगावातील पथकाने केली अटक
या गुन्ह्यात २०१८ पासून फरारी असलेला विनोद निकम यांच्यावर ओव्हर ड्राफ्टच्या आधारे कोट्यांवधी रुपये लाटल्याचा आरोप आहे. निकम शुक्रवारी भुसावळ बाजारपेठ पोलिसात एक तक्रार देण्यासाठी आला होता. त्याचवेळी पोलिसांच्या लक्षात आले की, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजनेच्या घोटाळ्यात पसार आरोपी आहे. भुसावळ पोलिसांनी तात्काळ जळगाव आर्थिक गुन्हे शाखेसोबत संपर्क साधत निकम संदर्भात माहिती दिली. यानंतर जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ गाठत निकमला ताब्यात घेतले.