महानगरपालिकेचे रूग्णालय स्वयंसेवी संस्था चालविणार

0

जळगाव । महानगरपालिकेची रुग्णालये स्वंयसेवी संस्थांना ना नफा ना तोटा तत्वावर चालविण्यास देण्याची प्रक्रीया महानगरपालिका प्रशासनाकडून सुरु झाली आहे. याअतंर्गत महानगरपालिकेच्या छत्रपती शाहु रुग्णालयासाठी दोन संस्थांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या संस्थांनी सवलतीच्या दरात अद्यावत रुग्णसेवा देण्याची संमती दिली आहे. यात जळगाव पिपल्स बँकेकडुन रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टचा एक प्रस्ताव आला आहे. यासह माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्याकडून गोदावरी फाऊंडेशनचा प्रस्ताव आला आहे.

रूग्णालयात विविध सुविधा असणार
महापालिकेची शहरातील मोक्याच्या ठिकाणी नऊ रुग्णालये आहेत. गरिब व गरजू रुग्णांना चांगल्या सुविधा पुरविण्यात या रुग्णलयांच्या प्रशासनाला अपयश येत आहे. रुग्णसेवांचा दर्जा उंचावण्यासाठी महापालिकेने ही रुग्णालये सेवाभावी संस्थांना ‘ना नफा-ना तोटा’ या तत्वावर चालविण्याचा ठराव सत्ताधार्‍यांनी मंजूर करुन घेतला होता. यानुसार प्रायेगिक तत्वावर छत्रपती शाहु महाराज रुग्णालय ना नफा ना तोटा तत्वावर स्वंयसेवी संस्थाना चलविण्यास देण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. महापालिकेत छत्रपती शाहु महाराज रुग्णालय चालविण्यासाठी दोन संस्थांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यासाठी निविदा प्रक्रीया राबवून संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते.यात रुग्णालय चालविण्यास घेणार्‍या संस्थांना त्या ठिकाणी सुरु महापालिकेची ओपीडी व प्रसुतीगृह आहे, त्या दरांमध्ये चालवावे लागेल. याशिवाय अद्यावत तंत्रज्ञान असलेल्या दर्जेदार सुविधा नागरिकांना परवडतील अशा सवलतीच्या दरात द्याव्या लागणार आहेत. यात नेत्र तपासणी, सीटी स्कॅन, एमआरआय, डायलिसीस शस्त्रक्रीया अशा सुविधा असतील. तसेच महानगरपालिका ओपीडी व प्रसुतीगृहाचे वीज व पाणी बिल भरणार आहे.