जळगाव । शहर नगरपालिकेचे सन 2003 मध्ये महापालिकेत रूपांतर झाले. या 17 वर्षांच्या कार्यकाळात प्रथमच सोमवारी एकाच दिवशी 116 लिपिक 184 शिपाई अशा एकूण 300 कर्मचार्यांच्या विभागांतर्गत बदल्या करण्यात आल्या. ही बदल्यांची प्रक्रिया राबवताना आयुक्त, उपायुक्तांनी प्रचंड गोपनियता पाळलेली दिसली. महापालिकेत सुमारे दोन हजार कर्मचारी कार्यरत आहेत. आयुक्त जीवन सोनवणे यांनी दोन महिन्यांपासून कर्मचारी बदल्यांचे संकेत दिले होते. त्यानुसार बदल्या होतील अशी कल्पना प्रत्येक कर्मचार्यांना होती; पण आयुक्त सोनवणे यांनी अत्यंत गोपनीयता पाळून एकाच दिवशी 116 लिपिक 184 शिपाई अशा एकूण 300 कर्मचार्यांच्या बदल्या केल्या. त्यामुळे सोमवारी सायंकाळी पालिकेत खळबळ उडाली होती. एकाच विभागात तीन वर्षे पूर्ण झालेल्यांच्या बदल्यांचा निकष समोर ठेवून ही कार्यवाही केल्याचे सांगण्यात येत आहे.