मुंबई । ओखी वादळामुळे महापरिनिर्वाणदिनी एकीकडे शिवाजी पार्कवर असुविधा असतांना दुसरीकडे मात्र आंबेडकरवादी अनुयायांकडून मदतीचा पाऊस निरंतर बरसत राहिला. या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. डॉ. रेवत कानिंदे आणि डॉ. आकाश गायकवाड या दोन तरुणांनी त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील मित्र-मैत्रिणींसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चैत्यभूमी-शिवाजी पार्क परिसरात आलेल्या अनुयायांना मोफत आरोग्यसेवेसोबत शेकडो गरजू महिलांना सॅनिटरी पॅड्सचे वाटप केले. तसेच सॅनिटरी पॅड्सबाबत जनजागृती देखील केली. आजही देशात गोरगरिब महिलांचा असा एक मोठा वर्ग आहे ज्यांच्यामध्ये सॅनिटरी पॅड्सविषयीची जागरुकताच झालेली नाही. नेमके हेच ओळखून या युवा डॉक्टरांनी ही अभिनव संकल्पना यशस्वीपणे राबविली.
ग्रामीण भागात जागरूकतेची कमी
यावेळी डॉ. रेवत कानिंदे यांनी सांगितले की, देशाच्या ग्रामीण आणि त्यातही विशेषकरुन गरिब महिलांमध्ये आजही मासिक पाळीविषयक अनेक गैरसमज आहेत. परंपरा, अंधश्रद्धांतून निर्माण झालेले हे गैरसमज दूर होणे अत्यंत आवश्यक असून महिलांमध्ये स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे, असे कानिंदे यांनी सांगितले. मासिक पाळीविषयक स्वच्छता न बाळगल्यामुळे महिलांमध्ये सर्व्हाइकल कॅन्सरची शक्यता वाढते, अशी माहिती डॉ. आकाश गायकवाड यांनी दिली.
डॉक्टरांचे कौतुकास्पद मदतकार्य
जे. जे. रुग्णालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन या संघटनेच्या सदस्यांनी सोमवार, मंगळवार आणि बुधवारी असे सलग तीन दिवस शिवाजी पार्क परिसरात प्रचंड मोठ्या संख्येने जमलेल्या भीम अनुयायांना वैद्यकीय सेवा पुरवल्या. गेल्या तीन दिवसांमध्ये दोन हजारांहून अधिक रुग्णांना तपासून त्यांना मोफत औषधे पुरवण्यात आल्याची माहिती डॉ. रेवत कानिंदे यांनी दिली.