महापालिकतर्फे अपंग व्यक्तींना दरमहा दोन हजार पेन्शन; महासभेची मान्यता

0

पिंपरी-चिंचवड : अपंगांसाठी विविध योजना राबविणार्‍या पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता अपंगांना पेन्शन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील पाच वर्षांवरील 40 टक्के अपंगत्व असलेल्यांना दरमहा दोन हजार रुपये ‘पंडित दिनदयाल उपाध्याय अपंग कल्याणकारी योजने’तंर्गत ही पेन्शन देण्यात येणार आहे. त्यासाठी आर्थिक उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही. लाभार्थी व्यक्ती शहरात तीन वर्षांपासून वास्तवास असावा ही अट असणार आहे. हा ठराव उपसूचनेसह सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. दरम्यान, जन्मताच अपंग असणा-यांना पेन्शन देण्याची उपसूचना विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी मांडली होती. मात्र, सत्ताधार्‍यांनी ती फेटाळून लावली. शहरात एक हजार 804 अंपगांची नोंद असून या योजनेसाठी तीन कोटी 24 लाख रुपये खर्च येणार आहे.

महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे अपंग कल्याणकारी योजना राबविण्यात येते. त्याअंतर्गत अपंग व्यक्तींसाठी विविध योजना अंमलात आणण्यात येतात. 28 ऑक्टोबर 2015 च्या शासन निणर्यानुसार महापालिकांकडे अपंग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आलेला तीन टक्के निधी हा त्याच महापालिका क्षेत्रातील नागरी भागातील अपंगांसाठी खर्च करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अपंगांसाठी ’पेन्शन योजना सुरू करणे’ याचा देखील त्यामध्ये उल्लेख आहे. अपंगांसाठी सामाजिक कार्य करणा-या अनेक स्वयंसेवी संस्थांकडून ही योजना सुरू करण्याची मागणी वारंवार होत आहे. त्याअंतर्गत पाच वर्षांवरील 40 आणि त्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या सर्व व्यक्तींना पेन्शनचा लाभ मिळणार आहे. या योजनेचे नाव पंडित दिनदयाल उपाध्याय पेन्शन योजना असणार आहे. या योजनेसाठी अंधांना कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही.

विरोधी पक्षनेत्यांची उपसूचना फेटाळली
पिंपरी-चिंचवड शहरात जन्म झालेल्या आणि जन्मताच अपंगत्व आलेल्या मुलांना देखील पेन्शन देण्यात, यावी अशी उपसूचना विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी मांडली. परंतु, सत्ताधार्‍यांनी ती फेटाळून लावली. तसेच या संदर्भात खुलासा करण्याची मागणी बहल यांनी केली. त्यावर प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी योजनेची माहिती दिली. शासनाच्या 2016 च्या नियमानुसार 40 टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तिंनाच त्याचा लाभ देण्याचा सूचना असल्याचे स्पष्ट केले. शहरात या वर्गातील एकूण एक हजार 804 अंपगांची नोंद असून, दिड हजार रूपयांप्रमाणे वर्षाला तीन कोटी 24 लाख रूपये निधी लागणार असून, तो निधी उपलब्ध आहे.

विरोधकांकडून सूचना
अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खर्च येतो. त्यामुळे वयाची 18 वर्षाची अट शिथिल करण्याची मागणी, माजी महापौर मंगला कदम, नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली. पेन्शनची रक्कम वाढविण्याची मागणी सचिन चिखले यांनी केली. लाभासाठी केशरी रेशनकार्डची अट रद्द करावी. तसेच अंधांनाही लाभ देण्यात यावा अशी मागणी नगरसेवक जावेद शेख यांनी केली.

उपसूचनेसह विषय मंजूर
या योजनेस पंडित उपाध्याय अपंग कल्याणकारी योजना असे नाव द्यावे. वयाची अट पाच वर्षांवरील करावी. पेन्शन दीडवरून दोन हजार रुपये करावी. अंधांसाठी अट नसावी, अशी उपसूचना सभागृह नेते एकनाथ पवार यांनी मांडली. नगरसेविका आशा शेंडगे यांनी त्याला अनुमोदन दिले. त्यानंतर महापौरांनी उपसूचनेसह हा विषय मंजूर केला.