महापालिका देणार गुणवंतांना आर्थिक स्वरूपात बक्षिस

0

अर्ज करण्याचे महापालिकेचे आवाहन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता दहावी आणि बारावीमध्ये 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी महापालिकेकडे अर्जांचा पाऊस पडला. त्यामध्ये 575 विद्यार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरले होते. मात्र, त्यापैकी 274 विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यांना पुन्हा संधी देत बक्षिसाची रक्कम देण्यात येणार आहे. त्यासाठी 32 लाख 45 हजार रूपये खर्च होणार आहे. स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

2015-16 पासून योजना
महापालिका नागरवस्ती विभागाच्यावतीने राबविण्यात येणार्‍या विविध कल्याणकारी योजनाअंतर्गत शहरातील खासगी शाळांमधील इयत्ता दहावीत 85 टक्क्यांपेक्षा जादा गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रूपये आणि 90 टक्क्यांपेक्षा जादा गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 15 हजार रूपये तसेच बारावीत 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रूपये बक्षीस रक्कम देण्यात येते. ही योजना सन 2015-16 पासून राबवण्यात येत आहे. 20 जुलै 2017 रोजी महापालिका सभेत या मुळ योजनेत दुरूस्ती करण्यात आली. त्यानुसार, इयत्ता दहावीत 80 ते 90 टक्के गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रूपये आणि 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 15 हजार रूपये तसेच बारावीत 80 टक्क्यांपेक्षा जादा गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 15 हजार रूपये बक्षीस देण्याबाबत मान्यता देण्यात आली.

सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता दहावीमध्ये 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार, 5059 अर्ज प्राप्त झाले. अर्जांची तपासणी केल्यानंतर 4 हजार 484 अर्ज पात्र झाले. तर 575 अर्ज अपात्र ठरले. 4 हजार 484 पात्र लाभार्थींना बक्षीस देण्यात आले. 575 अपात्र अर्जांपैकी 274 विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पुर्तता केली. त्यामध्ये दहावीत 80 ते 90 टक्के गुण मिळविणार्‍या 173 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना प्रत्येकी 10 हजार रूपयांप्रमाणे 17 लाख 30 हजार रूपये देण्यात येणार आहेत. 90 टक्क्यांपेक्षा जादा गुण मिळविणार्‍या 75 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 15 हजार रूपयांप्रमाणे 11 लाख 25 हजार रूपये देण्यात येणार आहेत. तर बारावीतील 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणार्‍या 26 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 15 हजार रूपयांप्रमाणे 3 लाख 90 हजार रूपये देण्यात येणार आहेत. असा एकूण 32 लाख 45 हजार रूपये खर्च होणार आहे. सन 2018-19 या आर्थिक वर्षात बक्षीस रक्कम देण्याबाबतच्या या उपलेखाशिर्षावर 7 कोटी 50 लाख रूपये इतकी तरतूद असून त्यातून हा खर्च करण्यात येणार आहे.

खासगी शाळेतील गुणवंतांनाही लाभ
पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी दहावीत मिळविलेल्या गुणांप्रमाणे मिळणार्‍या रकमेचा लाभ दिला जात आहे. याच धर्तीवर खासगी शाळांमधील दारिद्य्र रेषेखालील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. स्थायी समितीने ऐनवेळच्या विषयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता खासगी शाळांमधील विद्यार्थी देखील लखपती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.