धुळे- महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सोमवारी सुरुवात झाली. 1 ते 9 प्रभागासाठी 90 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या तर मंगळवारी प्रभाग 10 ते 19 साठी 85 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. दोन दिवसात भाजपातर्फे 175 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. भाजपातर्फे 2 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत इच्छुक उमेदवारांना अर्ज विक्री करण्यात आली होती. त्याच कालावधीत इच्छुकांनी अर्ज भरुन पक्षाकडे सादर केले होते. शहरातील पाचव्या गल्लीत असलेल्या सुवर्णकार भुवनातील महानगर मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात सोमवारी व मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजेला मुलाखती कार्यक्रम सुरु झाला. आजी-माजी नगरसेवकांनी मुलाखती घेण्यात आल्या आहेत.
20 नोव्हेंबरनंतर उमेदवारीची होणार घोषणा
पक्षातर्फे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी आमदार स्मिता वाघ, महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, विनोद मोराणकर यांनी इच्छुकांच्या मुलखतीवेळी उपस्थित होते. 20 तारखेनंतर उमेदवारीची होणार घोषणा पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा दोनदिवसीय कार्यक्रम संपल्यानंतर सर्वप्रथम प्रभागनिहाय उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार आहे. ती यादी शिफारशींसह पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठवली जाणार आहे. पक्षातर्फे प्रभागनिहाय सर्व्हे करण्यात आलेला असून त्या आधारे या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांवर प्रदेशाध्यक्ष दानवे अंतिम मोहर उमटवतील, अशीही माहिती महानगर जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल यांनी दिली.