प्रस्तावित पाणीपट्टी, मिळकत करवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेचे आंदोलन
पिंपरी-चिंचवड : महापालिकेने प्रस्तावित केलेली पाच टक्के पाणीपट्टी वाढ, पाणीपुरवठा लाभकर आणि मिळकत कर वाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने मंगळवारी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. तसेच प्रस्तावित पाणीपट्टी वाढ, मिळकत कर वाढ रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलनात शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, नगरसेवक नाना काटे , शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने, मयूर कलाटे, राजु बनसोडे, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर, शहरसंघटिका सुलभा उबाळे, नगरसेवक अमित गावडे, निलेश बारणे, अॅड. सचिन भोसले, माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मधुकर बाबर, राम पात्रे, सल्लागार भगवान वाल्हेकर, माजी नगरसेविका विमल जगताप, रोमी संधू, युवराज दाखले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव
महापालिका प्रशासनाने पाणीपट्टीत पाच टक्के, तर पाणीपुरवठा लाभकरात दुप्पट वाढ मागितली आहे. स्थायी समितीने पाणीपट्टी आणि लाभ करवाढीला मान्यता देखील दिली आहे. तर, अर्थसंकल्पामध्ये प्रशासनाने मिळकत करवाढ देखील सुचविली आहे. पाणीपट्टी वाढ आणि पाणीपुरवठा लाभ करवाढीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव महासभेसमोर मान्यतेसाठी ठेवला होता.
नागरिकांसाठी पाणीपट्टीमधील दरवाढ जास्त असून परवडणारी नाही. वास्तविक पाणीपुरवठ्यामध्ये 40 टक्के पाण्याची गळती होते. ही गळती थांबवल्यास पालिका प्रशासनाला पाणीपट्टीमध्ये दरवाढ करण्याची गरज भासणार नाही त्यामुळे ही गळती बंद करावी.
-आमदार गौतम चाबुकस्वार