महापालिका प्राथमिक शाळेतील पटसंख्या झपाट्याने घसरतेय

0

पिंपरी-चिंचवड : दिवसेंदिवस महापालिकेच्या शाळांचा गुणात्मक दर्जा ढासळत चालला आहे. त्यामुळे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या व मराठी माध्यमाच्या इतर खासगी शाळांच्या स्पर्धेतून महापालिकेच्या शाळा लवकरच बाद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेळीच उपाययोजना केली नाही तर, महापालिकेच्या शाळांना टाळे लावावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गुणात्मक दर्जा ढासळल्याने महापालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या झपाट्याने घसरली आहे. गेल्या दहा वर्षांत सुमारे साडेतेरा हजार विद्यार्थ्यांनी पट खाली आला आहे. दरम्यान, शाळांमधील पटसंख्या कमी होत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यासाठी खरेदीचा आकडा फुगत चालला आहे. महापालिका प्रशासनासह शिक्षण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने महापालिकेच्या शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

36 हजार 542 विद्यार्थी उरलेत
शहरात सध्या महापालिकेच्या 128 प्राथमिक शाळा आहेत. शहरातील थरमॅक्स कंपनी इंग्रजी माध्यमाच्या पाच शाळा चालवीत आहे. 2007 मध्ये महापालिकेच्या शाळांची विद्यार्थीसंख्या 50 हजार 196 एवढी होती. मात्र, सद्यस्थितीत 2016-17 मध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये केवळ 36 हजार 542 विद्यार्थी राहिले आहेत. गेल्या दहा वर्षात सुमारे साडेतेरा ते चौदा हजाराने पटसंख्या घसरली आहे. महापालिका शाळांची वाताहत होत असताना प्रशासनाकडून शैक्षणिक बजेट मात्र, नेहमीप्रमाणेच वाढीव मंजूर केले जात आहे. महापालिकेने विद्यार्थी आणि शिक्षक व आस्थापना खर्चासाठी 2016-17 मध्ये 151 कोटीचे बजेट शिक्षण मंडळासाठी मंजूर केले आहे. याचीही सखोल चौकशी होण्याची गरज असल्याचा सूर पालकवर्गातून उमटत आहे.

महापालिका प्रशासन प्रयत्नशील
इंग्रजी शाळांकडे पालक व विद्यार्थ्यांचा वाढता कल, आरटीई प्रवेश प्रक्रिया आणि स्थलांतरित विद्यार्थ्यांमुळे महापालिका शाळांची संख्या कमी झाली आहे. खासगी शाळांशी स्पर्धा करण्यासाठी महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना दर्जात्मक शालेय साहित्य मोफत पुरविले जाते. इतर खासगी शाळांच्या स्पर्धेत महापालिकेच्या शाळा टिकाव्यात, शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी महापालिका प्रशासनासह शिक्षण मंडळाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, असे महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांनी सांगितले.

…तर शाळांमधील पट टिकला असता
आमच्या कार्यकाळात 37 शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर मात्र, टप्प्याटप्प्याने ते कमी झाले. बदलत्या शिक्षणप्रणालीनुसार शिक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण देऊन सर्व शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू केल्यास व इयत्तानिहाय इंग्रजी संभाषण तसेच संगणकप्रणाली राबवली असती तर महापालिकेच्या शाळांमधील पट टिकला असता, असे मत महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गजानन चिंचवडे यांनी व्यक्त केले.