पिंपरी-चिंचवड : आपण घरात किंवा अन्य ठिकाणी असल्यावर तेथे अचानक आग लागली तर काय करावे, ती आग कशी विझवावी, आगीपासून स्वत:चे तसेच आपल्याजवळ असलेल्या इतर व्यक्तींचे संरक्षण कसे करावे, अशा दुर्घटनेच्या वेळी सतर्कता कशी बाळगावी, याची सर्व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. निमित्त होते; सेफ किड्स फाउंडेशनद्वारा आयोजित ‘सेफ किड्स अॅट होम’ या प्रबोधनपर कार्यक्रमाचे. महापालिकेच्या माध्यमातून सेफ किड्स फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम महापालिकेच्या शाळांमध्ये आयोजित करण्यात आला होता.
35 ते 40 शाळांमध्ये उपक्रम
आग लागली असता ती विझवणे, त्या आगीपासून संरक्षण करणे तसेच अशावेळी सतर्कता कशी बाळगावी, याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, या उद्देशाने महापालिकेच्या माध्यमातून सेफ किड्स फाउंडेशनद्वारा हा कार्यक्रम राबविण्यात आला. महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा 35 ते 40 शाळांमधील विद्यार्थ्यांना या माध्यमातून सुरक्षिततेचे धडे मिळाले.
विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
‘सेफ किड्स अॅट होम’ हा कार्यक्रम दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात आला. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना दोन तास प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्वयंपाक घरातील आग तसेच, घराबाहेर दुकाने, गोदाम आणि इतर ठिकाणी शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणाने लागणारी आग आटोक्यात कशी आणावी? याचे प्रशिक्षण या विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. आग लागल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीवेळी कोणते क्रमांक डायल करावेत तसेच अशावेळी त्वरित सेवा कशी उपलब्ध होईल, याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.