महापालिका स्थायीची 257 कोटींच्या विकासकामांना मंजुरी

0

रस्ते, उद्याने विकासावर सत्ताधारी भाजपचा भर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्यावतीने विकासकामांना प्राधान्य देत कामांचा धडाका सुरू ठेवला आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेजलाईन, वीज आदी विकासकामांवर प्रामुख्याने भर दिला आहे. महापालिकेच्या स्थायीने विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणार्‍या सुमारे 257 कोटी 53 लाख 93 हजार रुपयांच्या खर्चास नुकतीच मान्यात दिली.

उद्याने विकसित करण्यासाठी
रहाटणी येथे कोकणे चौक ते काळेवाडी फाटा चौकापर्यंत उच्चक्षमता दृतगती मार्ग विकसीत करण्यासाठी येणार्‍या सुमारे 28 कोटी 45 लाख 51 हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र. 24 मध्ये नव्याने ताब्यात येणार्‍या आरक्षित जागेस सिमा भिंत बांधणे व उद्यान विकसित करण्यासाठी येणार्‍या सुमारे एक कोटी 52 लाख 70 हजार रुपयांच्या खर्चास, पुनावळेतील आरक्षण क्रमांत 4-71 येथे उद्यान विकसित करण्यासाठी येणार्‍या सुमारे एक कोटी 54 लाख चार हजार रुपयांच्या खर्चास, चर्‍होली येथील मैलाशुध्दीकरण केंद्राची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी येणार्‍या सुमारे दोन कोटी सात लाख चार हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

बहुउद्देशिय इमारतीसाठी
चर्‍होली येथील आ.क्र.2-64 येथील उद्यानाची उर्वरित कामे करण्यासाठी येणार्‍या सुमारे एक कोटी आठ लाख 22 हजार रुपयांच्या खर्चास, मनपाचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी यांना इन्स्ट्रुमेंट मॅकेनिकल या व्यवसायाकरीता ट्रेनिंग वर्क बेंचेस खरेदी करण्यासाठी येणार्‍या सुमारे एक कोटी पाच लाख चार हजार रुपयांच्या खर्चास, थेरगाव सर्व्हे. नं. 9 येथे बहुउद्देशीय इमारत बांधण्यासाठी येणार्‍या सुमारे 11 कोटी 80 लाख 87 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी
जुन्या तालेरा हॉस्पिटलची इमारत पाडुन नविन इमारत बांधण्यासाठी येणार्‍या सुमारे 39 कोटी 13 लाख 70 हजार रुपयांच्या खर्चास, चापेकर चौक ते केशवनगर काळेवाडी रस्त्यांच्या क्राँक्रीटीकरणाचा दुसरा टप्पा विकसीत करण्यासाठी येणार्‍या सुमारे 11 कोटी सात लाख 16 हजार रुपयांच्या खर्चास, जाधववाडी कुदळवाडी मधील ताब्यात आलेल्या आरक्षणांच्या जागा विकसीत करण्यासाठी येणार्‍या सुमारे एक कोटी 47 लाख 52 हजार रुपयांच्या खर्चास, वाकड मध्ये नव्याने ताब्यात येणार्‍या जागेनुसार विकास आराखड्यातील रस्ते विकसीत करण्यासाठी येणार्‍या सुमारे एक कोटी 26 लाख सहा हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

नव्या एटीपी प्लँटसाठी 156 कोटी
राष्ट्रीय नागरी सुधारणा अभियान (अमृत) अंतर्गत मलनिस्सारण वाहिनी (ड्रेनेज लाईन) व मैला-सांडपाणी शुद्धिकरण प्रकल्पाचे (एसटीपी प्लॅन्ट) काम करण्यात येणार आहेत. यामध्ये दापोडी ते निगडी या मार्गावरील जुनी ड्रेनेज लाईन काढून तब्बल 209 किलोमीटर अंतरावर नवी लाईन टाकण्यात येणार आहेत. तसेच, बोपखेल, चिखली व पिंपळे निलख येथे तीन नवे एसटीपी प्लॅन्ट बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी येणार्‍या 156 कोटी खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

पिंपरी येथील एसटीपी प्लॅन्टमधील अतिरिक्त तीन एमएलडी मैला-सांडपाणी कासारवाडी येथील प्लॅन्टवर पंपिंग स्टेशनद्वारे पाठविला जाणार आहे. नव्या तीन एसटीपी प्लॅन्टमुळे शहरात एकूण 16 प्लॅन्ट होणार आहेत. त्यामुळे 333 एमएलडीत वाढ होऊन 396 एमएलडी मैला-सांडपाणी शुद्धिकरण होईल. या कामांचा कालावधी 24 महिन्यांचा असणार आहे.