पिंपरी-चिंचवड : अपंगांसाठी विविध योजना राबविणार्या महापालिकेने आता अपंगांना पेन्शन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आता दरमहा दीड हजार रुपये पेन्शन स्वरूपात देण्यात येणार आहेत. अपंगांसाठी राखून ठेवलेल्या तीन टक्के अपंग कल्याण निधीच्या विनियोगाचा हिशेब व भविष्यातील खर्चाचे नियोजन येत्या सोमवार (दि. 13) पर्यंत अपंग कल्याण आयुक्तालयाला सादर करावे, अशा सूचना राज्यातील सर्व महापालिकांना देण्यात आल्या आहेत. खर्चाचे नियोजन महापालिकांनी स्वत:हून न केल्यास निधीच्या विनियोगासाठी भाग पाडण्यात येईल, असा इशारा अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी दिला आहे.
लाभार्थींसाठी अटी व शर्ती!
रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, घरपट्टी पावती, लाईटबिल, टेलिफोन बील यापैकी एक वास्तवाचा पुरावा म्हणून आवश्यक. अपंग अर्जदाराचे किमान वय अठरा वर्ष पूर्ण असले पाहिजे. 40 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असणा-याला या योजनेचा लाभ मिळणार. पेन्शनधारक शासकीय किंवा निमशासकीय सेवेतील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. केंद्र किंवा राज्य सरकारच्या सामाजिक अर्थसहाय्य योजनेद्वारे मिळणारी रक्कम वजा करून उर्वरित रक्कम मिळेल. लाभार्थ्यांनी अर्जासोबत आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. लाभार्थींनी दरवर्षी 1 ते 31 जानेवारी या कालावधीत हयातीचा दाखला सादर करावा.