महापालिकेचा गुरूवारी अर्थसंकल्प

0

पाच हजार कोटींच्या पुढील अंदाजपत्रकाची शक्यता

पिंपरी-चिंचवड : महापालिकेचा सन 2018-19 या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प गुरुवारी सकाळी अकरा वाजता आयुक्त श्रावण हर्डीकर स्थायी समितीला सादर करणार आहेत. पालिकेचा हा 36 वा, तर हर्डीकर यांचा पहिला, तर, भाजपचा हा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. शहरवासियांसाठी कोणते नवीन प्रकल्प, योजना या अर्थसंकल्पात असणार आहेत. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गतवर्षीचे 5 हजार 100 कोटीचा अर्थसंकल्प होता. तर यंदा देखील पाच हजार कोटीच्या पुढे अंदाजपत्रक असेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

आर्थिक शिस्तीचा दावा
आगामी वर्षात शून्य तरतूद असलेले सर्व लेखा शिर्षक वगळण्यात येणार आहेत. जेवढ्या रकमेचे काम आहे. तेवढ्याच रकमेची निविदा काढायची, त्यासाठी तेवढीच रक्कम अर्थसंकल्पात ठेवण्यात येणार आहे. चालू विकास कामांसाठी 100 टक्के तरतूद केली जाणार आहे. त्याला पैशांची कमतरता भासली जाणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. बजेटची माहिती येईपर्यंत, जेवढ्या वर्कऑर्डर (कार्यरंभ आदेश) दिले आहेत. त्यांची माहिती घेऊन त्यासाठी लागणा-या पैशांची बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. देखभाल व दुरुस्तीसाठी विभागाने जेवढे पैसे मागितले आहेत. तेवढे पैसे दिले जाणार आहेत. त्याचबरोबर शून्य तरतूद अथवा टोकन हेडला यंदापासून मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे आहे त्याच कामावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या निर्णयांमुळे पालिकेला आर्थिक शिस्त लागेल अशा, प्रशासनाचा दावा आहे.

101 नागरिकांचा सहभाग
महापालिकेने 2018-19 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पासाठी दहा लाखांपर्यंतची कामे सुचविण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून 101 जणांनी कामे सूचविली आहेत. त्यामध्ये स्थापत्य, विद्युत आणि पाणीपुरवठा विषयक कामे आहेत. या कामांचा अर्थसंकल्पामध्ये समावेश होणार आहे.

स्थायी समितीची बैठक
महापालिकेने अर्थसंकल्प सादर करण्यासाठी गुरुवारी स्थायी समितीची बैठक घेतली आहे. अर्थसंकल्प तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. स्थायी समितीकडून चर्चा करून हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात येईल.त्यानंतर तो महापालिका सर्वसाधारण महासभेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. अर्थसंकल्पामध्ये ’जेएनएनयुआरएम’सह स्मार्ट सिटी, अमृत योजना, स्वच्छ भारत योजनांचाही समावेश असणार आहे.