महापालिकेची ‘पीएमपीएमएल’ला तंबी

0
‘बीआरटीएस’मध्ये बस चालक करतात नियमांचे उल्लंघन
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बीआरटीएस मार्गावरील पीएमपीएमएलच्या बस चालकांकडून सिग्नलचे पालन केले जात नाही. वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे महापालिकेने पीएमपीएलला पत्र पाठवून चालकांना नियमांचे पालन करण्याची सक्त ताकीद देण्यात यावी, अशी तंबी दिली आहे.
दरवाजे उघडे, बस पडतात बंद
दापोडी ते निगडी हा बहुचर्चित बीआरटीएस मार्ग आठ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर 24 ऑगस्टपासून सुरु झाला आहे. परंतु, हा मार्ग अडथळ्यांची शर्यत ठरत आहे. बसस्थानकावर चालकांकडून दक्षात घेतली जात नाही. दरवाजे उघडे असतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात येत नाही. मार्गातच बंद बस पडतात. काही वेळा तर प्रवाशी बीआरटी थांब्यावर तर बस सेवा रस्त्याने धावत असतात.
चालकांना सूचना द्या
बीआरटीएस बसच्या चालकांकडून पिंपरी चौकात सिग्नलचे पालन केले जात नसल्याचे नगरसेविका सीमा सावळे यांच्या मंगळवारी (दि.11) निदर्शनास आले. यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी ही बाब पालिकेच्या बीआरटी विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर स्थापत्य विभागाचे सह शहर अभियंता राजन पाटील यांनी पीएमपीएलच्या निगडी आगाराचे प्रमुख, बीआरटीएसचे व्यवस्थापक आणि वाहतूक व्यवस्थापकांना पत्र पाठवून पीएमपीएल बस चालकांना सिग्नल आणि वाहतूक नियमाचे पालन करण्याचे सक्त देण्यात यावेत, अशी तंबी दिली आहे.