मुंबई : बेस्ट आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्यामुळे बेस्ट कर्मचार्यांचे पगार थकवले जात आहेत, बसमार्ग बंद केले जात आहेत, कंत्राटी भरती सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे बेस्टची जबाबदारी महापालिकेने घ्यावी, अशी मागणी बेस्टमधील 12 कामगार संघटनांच्या बेस्ट संघर्ष समितीने केली आहे. त्यासाठी सोमवारी महापौर डॉ. विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासोबत चर्चा झाली, मात्र त्यातून तोडगा न निघाल्याने संघटनांनी पूर्वनियोजित बेमुदत साखळी उपोषण उद्या, 1 ऑगस्टपासून वडाळा आगार येथे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान यामुळे काही प्रमाणात परिवहन सेवेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बैठकीत महापालिका आयुक्त बेस्ट महाव्यवस्थापक, पालिकेतील गटनेते, विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्तिथ होते .
महापालिकेच्या सूचना संघटनांनी फेटाळल्या
या बैठकीत महापालिका आयुक्तांनी बेस्टला अनेक उपाययोजना सुचविल्या. त्यात 1250 बसगाड्या भाड्याने घेणे, कामगार भरतीस स्थगिती, बसमार्गांचे पुनर्निरीक्षण करणे, जीपीएस प्रणाली अंमलात आणणे, कमी भारमान असणारे 150 बसमार्ग बंद करणे यासारख्या सूचनांचा समावेश होता. बेस्ट समिती सदस्यांनी ह्या सूचना बेस्ट समितीत मंजूर कराव्यात अशी आयुक्तांनी आग्रही मागणी केली, मात्र बेस्ट समिती सदस्यांनी ह्या सूचना ह्या पूर्वीच फेटाळल्या आहेत. त्याचबरोबर विविध कामगार संघटनांनी ह्या सूचनांना विरोध केला. त्यामुळे या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.
महापालिकेने बेस्ट चालवणे कर्तव्य समजावे
बेस्ट संघर्ष कृती समितीचे शशांक राव म्हणाले की, महापालिका आयुक्त बेस्टबद्दल कोणताही निर्णय घेण्यास तयार नाहीत. बेस्ट हा महापालिकेचाच एक भाग आहे. जसे आरोग्य सेवा, शिक्षण सेवा महापालिकेसाठी बंधनकारक कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे जनतेला परिवहन सेवा पुरविणे हेही पालिकेचे कर्तव्य आहे. नफ्याच्या दृष्टीने विचार न करता आयुक्तांनी बेस्टला आर्थिक मदत देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.