महापालिकेचे आरक्षीत भूखंड बळकावणे, हा भाजप नगरसेवकांचा धंदा

0
पिंपरी – संभाजीनगर येथील एमआयडीसीच्या जी ब्लॉकमधील बस टर्मिनलसाठी आरक्षित भूखंडाचे सपाटीकरण करून त्याठिकाणी भाजप नगरसेवक तुषार हिंगे बेकायदेशीर फुड फेस्टीव्हल आणि आठवडे बाजार भरवित आहे. भाजपच्या नगरसेवकांनी अधिका-यांना हाताशी धरून महापालिकेचे मोकळे प्लॉट बळकावण्याचा धंदा सुरू केला आहे. त्यावर आयुक्तांचा अंकुश राहिलेला नाही. आयुक्त हा चावीवरचा बाहूला बनला आहे, अशी टिका राष्ट्रवादीच्या महापौर मंगला कदम यांनी सोमवारी (दि. 7) पत्रकार परिषदेत केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने 1994 रोजी एमआयडीसीकडून या मोकळ्या भूखंडाचा ताबा घेतला आहे. त्यावर बस टर्मिनसचे आरक्षण निश्‍चित केले आहे. हे काम प्रस्तावीत असताना त्याठिकाणचा ताबा घेऊन नगरसेवक कामठे यांच्याकडून तेथील सपाटीकरण करण्यात येत आहे. भूखंडाच्या सुरक्षाभिंती तोडण्यात आल्या आहेत. अधिकारी सुपेकर यांना हाताशी धरून हिंगे हा उद्योग करत आहे. फुड फेस्टीव्हल आणि आठवडे बाजारच्या नावाखाली भूखंडाचा ताबा घेऊन नंतर त्याठिकाणी अन्य धंदे सुरू करण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोपही मंगला कदम यांनी केला आहे.
पाच ते सहा एकर भूखंडावर मनमानीप्रमाणे बाजार भरविण्यात येत आहे. हिंगे यांच्या वाढदिवसानंतर त्याठिकाणी अतिक्रमण वाढणार आहे. त्यातच निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशात अतिक्रमण वाढल्यावर पालिका कारवाई करणार नाही. याबाबत दोन दिवसांपूर्वी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी बेकायदेशीरपणे काम होत असेल तर संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आश्‍वासन दिले आहे, असेही कदम यांनी सांगितले. यावेळी माजी महापौर वैशाली घोडेकर उपस्थित होत्या.