महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केली पाहणी

0

लवकरात लवकर ही भिमसृष्टी जनेतेसाठी खुली करावी
पालिका प्रशासनाला दिल्या सूचना पिंपरीत साकारणार भिमसृष्टी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला असून या पुतळ्याच्या परिसरात भीमसृष्टी या नावाने शिल्पसृष्टी साकरण्यात येणार आहे. स्थापत्यविषयक कामे सुरू आहेत. भीमसृष्टीतील कलाकृतींना अखेरचा हात देण्याचे काम सुरू आहे. कला संस्कार संस्थेचे प्रमुख आणि पुण्यातील युवा शिल्पकार महेंद्र थोपटे यांनी जीवन चरित्र साकारले असून या कलाकृतींची पाहणी महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केली. तसेच काही सूचनाही केल्या. लवकरात लवकर ही भिमसृष्टी जनेतेसाठी खुली करावे, अशा सूचना पालिका प्रशासनास केल्या.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावर आधारित शिल्पसृष्टी पिंपरी-चिंचवड शहरात उभारली जाणार आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ही शिल्पसृष्टी साकरणार असून कलाकृती तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. एकनाथ पवार यांच्या सह पाहणी करण्यासाठी स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, नगरसेवक बाबा त्रिभुवन, संतोष कांबळे, सागर आंगोळकर, अंबरनाथ कांबळे, युवा नेते अमित गोरखे, कार्यकारी अभियंता संजय कांबळे आदी उपस्थित होते.

भीमसृष्टीमध्ये 19 प्रसंगांचा समावेश
एकनाथ पवार म्हणाले पुढे म्हणाले की, घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोलाचे आहे. बाबासाहेबांच्या जिवनावर आधारीत भीमसृष्टी साकारण्यात येत आहे. त्यात बाबासाहेबांच्या आयुष्यातील 19 प्रसंगांचा समावेश आहे. त्यातील 15 कलाकृतींचे काम पूर्ण झाले आहे. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेताना, बालपण, सरकारी दिव्याखाली सुरू असणारा अभ्यास, पदवी मिळाला तो प्रसंग, बैलगाडीतून खाली उतरविण्याचा प्रसंग, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना घटना सुपूर्द करताना, नागपूरच्या दिक्षा भूमीत केलेले भाषण, महाड येथील चवदार तळ्याचा प्रसंग, नाशिक येथील काळारांम मंदिर अस्पृशांसाठी खुले केले, अशा प्रसंगांचा त्यात समावेश आहे. म्युरल्स बरोबरच काही ठिकाणी कोलाजही असणार आहे. त्यात मजूरमंत्री म्हणून शपथ घेताना, फोटोग्राफी शिकताना, बौद्ध धर्म स्विकारताना असे प्रसंग असणार आहेत.

पुतळ्याजवळ चार प्रमुख कलाकृती असणार आहे. तसेच पुतळा परिसराच्या सीमा भिंती लगत एकुण 15 कलाकृती उभारण्यात येणार आहेत. बाबासाहेबांवर अभ्यास करणार्‍या अभ्यासकांच्या सूचनांचाही अंतर्भाव या कलाकृती निर्माण करताना केला आहे. या कलाकृती अंतिम टप्यात आल्या आहेत. येत्या पाच महिन्यात भिमसृष्टी शहरवासियांसाठी खुली करण्याचे नियोजन केले आहे. शहराच्या वैभवात भर टाकण्याचे काम शिल्पसृष्टीच्या माध्यमातून होणार आहे. आपली ओळख ठरणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.