अंदाजपत्रकात दहा कोटींची तरतूद; निधी केला वर्ग, ससूनच्या धर्तीवर रुग्णालयही
पुणे : अंदाजपत्रकात तरतूद करूनही महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरू करण्याला मुहूर्त मिळेना. चालू आर्थिक वर्षातही स्थायी समिती अध्यक्षांनी अंदाजपत्रकात यासाठी तरतूद केली. मात्र, तो निधी वर्गीकरण करण्यात आला आहे. ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय’ या नावाने महापालिकेतर्फे वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा सत्ताधारी भाजपने केली होती. त्यासाठी अंदाजपत्रकात दहा कोटी रुपयांची तरतूदही केली होती. परंतु, त्याचेही वर्गीकरण करण्याची वेळ सत्ताधार्यांवर आली आहे.
महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये वैद्यकीय महाविद्यालय आणि नर्सिंग महाविद्यालयासाठी 10 कोटींची तरतूद अंदाजपत्रकामध्ये केली होती. याशिवाय ससूनच्या धर्तीवर अत्याधुनिक रुग्णालयही उभारण्याची घोषणाही सत्ताधार्यांनी केली होती. मात्र, या दोन्हीसाठी तरतूद झाली तरी जागा निश्चितीही करण्यात आली नाही. या आर्थिक वर्षात ते होणेही शक्य नाही. महापालिका प्रशासनाने वैद्यकीय महाविद्यालयाचा आराखडा करण्यासाठी सल्लागार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. निविदा मंजूरही झाली. काही महिन्यांपासून या सल्लागाराला वर्क ऑर्डरच दिली नाही. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय उभारणी संदर्भातील कोणतेच काम होऊ शकले नाही.
महाविद्यालयासाठी महापालिकेची जागा आहे. आराखडा तयार करणे, विविध प्रकारच्या परवानग्या आणणे, त्याचबरोबर उभारणीसंदर्भात सर्व काम सल्लागार करणार होते. यासाठी कामाचे विविध टप्पे निश्चित करण्यात आले होते. मात्र, वर्क ऑर्डरच नसल्याने पुढे काहीच होऊ शकले नाही.
सल्लागार नियुक्तीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा
महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सल्लागार नियुक्तीच्या संदर्भात आपण प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. आरोग्य विभागाने स्थायी समिती अध्यक्ष अथवा आपल्याला वर्गीकरणासंदर्भात कोणतीच माहिती दिली नाही. प्रकल्पाचे वर्गीकरण प्रकल्पासाठीच झाले पाहिजे, असे माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.