महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना विविध आजार

0

पुणे । जिल्हा रूग्णालयाच्या वतीने महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणार्‍या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची नुकतीच आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये मुलांच्या तुलनेत एकूण 562 मुलींना विविध आजार झाल्याचे समोर आले आहे. यात 172 मुलींना रक्तक्षय हा आजार झाला आहे. तर 18 मुलांना रक्तक्षयाची लागण झाली आहे. तसेच एकूण 146 मुलांना जंताचा व 108 मुलांना दंत विकार तर 18 मुलांना रात अंधळेपणा व 121 मुलांना कानस्त्राव या आजाराची लागण झाली आहे, विशेष म्हणजे या सर्व आजारांमध्ये मुलां पेक्षा मुलींचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

562 मुली आजारग्रस्त
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा रूग्णालयाच्या वतीने महापालिकेच्या शाळांमधील 90 हजार 909 मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दरवर्षी ही आरोग्य तपासणी केली जाते. शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये 94 हजार 340 विद्यार्थी असून त्यात 47 हजार 130 मुली तर 47 हजार 023 मुले आहेत. त्यातील 90 हजार 909 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सुमारे 945 मुलांना वेगवेगळया स्वरूपाचे आजार आढळून आले आहेत. यामध्ये 562 मुली व 383 मुलांचा समावेश आहे.

लोह आणि प्रथिनांची कमतरता
काही कीटकनाशकांचा परिणाम, बेन्झिनच्या रेणुशी आलेला संपर्क, काही ऑटो इम्युन विकार, अशा अनेक करणांनी रक्तक्षय होण्याची शक्यता असते. व दैनंदिन जेवणात लोह आणि प्रथिनांची कमतरता असल्यास रक्तक्षय झाल्याचे दिसून येते. त्यातच महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारी मुले ही आर्थिक दुर्बल घटकांमधील असल्याने या शाळांमधील मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे.

172 मुलींना रक्तशय
हा तपासणी अहवाल आरोग्य विभागाने महिला आणि बालकल्याण समितीपुढे ठेवला आहे. आरोग्य तपासणीमध्ये किशोरवयीन मुली विविध आजारांनी ग्रस्त असल्याचे समोर आले आहे. त्यात 172 मुलींना रक्तशय झाल्याचे समोर आले आहे. रक्तातील पेशींची संख्या कमी झाली, की रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटते. रक्तक्षय होण्याचे प्रमुख कारण रक्तस्त्राव होत राहणे हे आहे. तसेच बोन मॅरो अकार्यक्षम झाल्यास रक्तक्षय होतो.

आजाराचे नाव      मुली      मुले       एकूण
रक्तक्षय              172      18       190
जंतदोष                86      60       146
रातआंधळेपणा        10       8          18
कानस्त्राव              59      62       121
खरुज                  28      29        57
त्वचा रोग               23      21        44
नेत्र विकार              50      53       103
दंत विकार              62      46       108
इतर आजार            72       86      158
एकूण                 562      383     945