पुणे । राज्यात सर्वत्र पुस्तके उपलब्ध केली आहेत, असा दावा बालभारतीने केला असला, तरी अजूनही पुणे महापालिकेच्या शाळेंतर्गतच पहिलीची मराठी आणि इंग्रजीची पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. बालभारतीची पुस्तके पहिल्याच दिवशी सर्व शाळांमध्ये दिली जाणार, असा दावा जरी शिक्षण विभागाने केला असला, तरी प्रत्यक्षात काहीच पुस्तके उपलब्ध असल्याचे समोर येते आहे.राज्यात यंदा इयत्ता पहिली, आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदलल्याने नवी पुस्तके बाजारात आली आहे. महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळाने (बालभारती) ही सर्व पुस्तके बाजारात उपलब्ध करून दिल्याचे सांगितले आहे.
बाजारात पुस्तके उपलब्ध : दत्तात्रय केत
बालभारतीने पहिली ते बारावीच्या 10 कोटी 89 लाख पुस्तकांची छपाई केली आहे. यंदा पहिली, आठवी व दहावीचा पाठ्यक्रम बदलल्याने ही पुस्तके बाजारात आली आहेत. इयत्ता पहिलीची सर्व पुस्तके आम्ही 7 जून रोजीच उपलब्ध करून दिली आहेत. तर आठवीची पुस्तके 17 ते 22 मे दरम्यानच उपलब्ध करून दिली आहेत. फक्त इयत्ता पहिलीचे सिंधी व अरेबिक पुस्तक राहिले आहे. त्याचीही छपाई लवकरच पूर्ण होईल. बाकी सर्व विषयांची पुस्तके आम्ही बाजारात उपलब्ध करून दिली असल्याचे बालभारती वितरण विभाग अधिकारी दत्तात्रय केत यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. इयत्ता पहिली, आठवी व दहावीची जी सर्वसाधारण माध्यमे आहेत, त्यांची सर्व पुस्तके दुकानांमध्ये उपलब्ध आहेत, असे पुस्तक विक्रेते सांगतात. पण, अजूनही पालिकेच्या शाळांपर्यंत मात्र बालभारतीची गाडी पोहचली नसल्याचे पालिकेच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीवरून समोर येते आहे.
इयत्ता आणि पुस्तकांची छपाई
1 ली : 25 शीर्षक : 91 लाख 40 हजार
8 वी : 52 शीर्षक : 1 कोटी 53 लाख 16 हजार
10 वी : 87 शीर्षक : 1 कोटी 77 लाख 65 हजार
पुस्तके पोहचली नाही
पालिकेच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली व आठवीची पुस्तके पोहचली आहेत. पण, त्यामध्ये इयत्ता पहिलीसाठी बालभारतीची मराठी आणि इंग्रजीची पुस्तके आली नाहीत. तसेच इयत्ता आठवीची कन्नड व गुजराथी माध्यमाची पुस्तके नाहीत.
– शिवाजी दौंडकर, प्रभारी शिक्षण प्रमुख,
मनपा शिक्षण विभाग