महापालिकेच्या सुविधा फुरसुंगीला कधी?

0

फुरसुंगी । महापालिकेत फुरसुंगी गावाचा सामावेश होऊन सहा महिने होत आले आहेत. नागरिकांना आनंद होणे, समस्या मिटणे, विविध विकासकामे मार्गी लागणे, चांगले रस्ते, शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा मिळणे अपेक्षित असताना अगदी याच्या विरोधात फुरसुंगी गावाची परिस्थिती दिसत असून विविध समस्यांचा डोंगर उभा राहताना दिसत आहे. पालिकेने गोड बोलून फुरसुंगी ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

गेल्या 6 महिन्यांपासून गावातील 200 रुपये रोजंदारीवार काम करणार्‍या अंदाजे 31 कामगारांचा पगार झालेला नाही ग्रामपंचायत असताना गेल्या दीड वर्षापासून काम करणारे 31 कामगार भेकराईनगर आणि फुरसुंगी गावात प्राथमिक स्वरुपाची म्हणजेच कचरा उचलणे, नळ पाणीपुरवठा व दुरुस्ती करणे, खोदाई करणे, ड्रेनेज साफ करणे, सार्वजानिक शौचालय साफसफाई करणे अशी विविध कामे करत असतात. या कामगारांना अद्याप गणवेश, तोंडाचे मास्क, हातमोजे, बूट नसतानाही आजही ते कामगार आपले काम प्रामाणिकपणे चोख बजावीत आहेत. कोणत्याही अत्याधुनिक उपकरणाविना अडचणींना सामोरे जाऊन गेल्या सहा महिन्यांपासून बिनपगारी काम करीत आहेत. पगार मिळेल या आशेवर काम सुरू आहे. कोणत्याही आरोग्य विमा, अपघाती विमा संरक्षण, वैद्यकीय सुविधा समस्या भेडसावत आहेत. त्यांचे थकीत वेतन, विमा संरक्षण कधी मिळणार? तसेच त्यांना रोजंदारीवर सेवेत कधी सामावून घेणार असा सवाल उपस्थित करीत आहेत.

कचरा फुरसुंगीच्या पथ्यावर
महापालिका वर्षानुवर्षं फुरसुंगी हद्दीत उरुळी देवाची येथे कचरा टाकण्याचे काम करीत आहे, येथील कचरा प्रकल्पाबाबत वारंवार आंदोलने झाली, पालिका सत्ताधारी व मुख्यमंत्री यांनी विकासकामे करण्याची आश्‍वासने दिली, प्रत्यक्षात नागरी सुविधा मिळत नाहीत, विहिरी दूषित झाल्या, हे गाव पालिकेत घेण्याची घाई करून ग्रामस्थांचे तोंड दाबण्याचा डाव भाजपने केला असल्याचे ग्रामस्थ बोलत आहेत.