रोल मॉडेल म्हणून केले होते सिलेक्ट
पुणे : डिजीटल पेमेंटमध्ये महापालिकेने केंद्र सरकारचा पुरस्कार मिळविला असला तरी प्रत्यक्षात महापालिकेने सुरू केलेल्या बहुतांश ऑनलाइन सेवा बंद पडल्या आहेत. त्यांची संख्या एक-दोन नव्हे तर तब्बल 111 आहे. महापालिकेला नुकताच केंद्र सरकारकारचा स्मार्ट सिटी डिजीटल पेमेंटचा पुरस्कार देण्यात आला. महापालिकेने सुरू केलेल्या ऑनलाइन पेमेंट आणि अन्य सुविधांसाठी रोल मॉडेल म्हणून केंद्र सरकारने पुणे महापालिकेची निवड निवड केली आणि पुरस्कारही दिला. मात्र, त्या सुविधांचा उपयोग होतो का, त्या सुविधा सुरू आहेत का याचा विचार केला गेला नाही.
ऑनलाइन सेवांकडे दुर्लक्ष
महापालिकेच्या विविध सेवांसाठी नागरिकांना संबंधित विभागांकडे जाऊन अर्ज दाखल करणे, चलन घेणे, पैसे भरणे आणि चलन अर्जासोबत संबंधित विभागाकडे दाखल करणे यामध्ये नागरिकांचा वेळ, श्रम आणि पैसा वाया जातो. तसे होऊ नये यासाठीच या सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. परंतु, त्याचा काहीच उपयोग नसल्याचे यावरून दिसून येत आहे. स्वयंसेवी संस्थेने यासाठी महापालिकेला पत्रही दिले आहे. मात्र, त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसून येते.
पैसे वसुलीच्या सेवांकडे विशेष लक्ष
मिळकतकर वसुली आणि अन्य वसुलींच्या ऑनलाइन सेवांकडे मात्र महापालिका प्रशासनाने अत्यंत कटाक्षाने लक्ष दिले आहे. मात्र, एनओसी देणे, अर्ज उपलब्ध करून देणे, नागरिकांच्या समस्या निवारण या ऑनलाइन सुविधांकडे मात्र कोणतेच लक्ष देण्यात आले नाही. महापालिकेकडून तब्बल 111 सेवा देण्यात येतात. यापैकी सध्या केवळ मिळकत कर भरण्याची सुविधा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध आहे.