जळगाव । गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेचे काही वाहने नादुरुस्त अवस्थेत पडले असून या वाहनांचा लिलावाच्या निवीदा काढूनही लिलाव होऊ शकला नाही. यामुळे या वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे़ याबाबत वाहन लिलाव समितीच्या बैठकीत चर्चा होवून मंजुरी मिळाली आहे़ या बैठकीत उपप्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक सचिन बुरुळ, शहर अभियंता डी. बी. दाभाडे, वाहन विभागाचे सुनील भोळे, बाळासाहेब लासुरे, जयंत नेहते आदी उपस्थित होते़
आरटीओचे फेरमुल्यांकन
महानगरपालिकेच्या नादुरुस्त अशा 38 वाहनांचे विक्री करीता आरटीओ करुन मुल्यांकन करण्यात आले होते़ तसेच मुलांकनानुसार वाहने विक्रीकरीता मनपाकडून 5 वेळा निवीदा काढण्यात आल्या होत्या. परंतु, या वाहनांचा वापर जास्त प्रमाणात झाला असल्याने आरटीओकडून मिळालेल्या मुल्यांकनाची किंमत जास्त होत होती़ परिणामी या वाहनांच्या विक्रिच्या निवीदांना प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे वाहनांचा लिलाव लांबणीवर पडला होता़ वाहन खरेदीकरीता प्रतिसाद मिळत नसल्याने वाहनांचे भंगार झाले आहे़ त्यामुळे सदर वाहनांच्या फेरमुल्यांकन करण्याकरीता समिती गठीत करण्यात आली होती़ या समितीच्या शिफारशीनुसार व आरटीओच्या फेरमुल्यांकनाच्या किमती नुसार ह्या 38 वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली़
लिलावातील वाहने : टॅक्टर – 13, डंपर – 2 , टाटा 709 – 1, अंबेसीटर – 5, सुमो – 6, जीप – 2, जीपसी – 1, टॅक्टर – 2, अरमाडा – 4, काँटेसा – 2 असे एकूण 38 वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.