धुळे । महापालिकेत विविध कामांनिमित्त येणार्या नागरीकांना अधिकारी, कर्मचारी जागेवर नसल्याने हेलपाटे मारण्याची वेळ येत असून हा प्रकार बंद केला जावा आणि अधिकारी कर्मचार्यांनी दुपारी 4 ते 6 या कालावधीत कार्यालयांमध्येच उपस्थित रहावे. अशी सूचना विरोधी पक्ष नेत्या वैशाली भुपेंद्र लहामगे यांनी महापौर आणि आयुक्तांना पत्राव्दारे केली आहे. कर्मचारी जागेवर राहत नसल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची होणारी परवड थांबविण्यासाठी अधिकारी व कर्मचार्यांनी कार्यालयांत निर्धारीत वेळेत हजर रहावे जेणेकरून नागरिक त्याच वेळेत कार्यालयांत आल्याने त्यांचे कामे होण्यास मदत मिळणार आहे.
कार्पोरेट पध्दतीने कामकाज करा
हा प्रकार नगरपालिका, ग्रामपंचायती सारखा ढिसाळ कारभारासारखा असल्याने धुळे महापालिकेने कार्पोरेट पध्दतीने प्रशासकीय कामकाज व्हावे अशी धुळेकरांची अपेक्षा आहे. त्यामुळे नागरीकांचे हेलपाटे थांबविण्यासाठी मनपा अधिकारी कर्मचार्यांना दुपारी 4 ते 6 या वेळेत कार्यालयामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश पारीत करावे अशी मागणी या पत्राव्दारे विरोधी पक्षनेत्या वैशाली लहामगे यांनी केली आहे.
वेळेचा अपव्यय टाळा
नागरिकांना एकाच कामांसाठी 4 ते 5 वेळा महापालिकेत यावे लागत असल्याने वेळेचा अपव्यय होत आहे. नागरिकांना आपल्या अडी-अडचणी मांडण्यासाठी महापालिकेत यावे लागत असतांना कार्यालयात अधिकारी व कर्मचारी जागेवर राहत नसल्याने हेलपाटे मारावे लागत आहे. यात्रासातून नागरिकांची सूटका करण्यासाठी अधिकारी व कर्मचार्यांनी दुपारी 4 ते 6 या कालावधीत कार्यालयांत उपस्थितीची मागणी करण्यात आलेली आहे.
ताळमेळ, संवाद नसल्याने गैरसोय
शहरातील नागरीक विविध प्रकारची कागदपत्रे, परवानग्या तसेच नागरीक मुलभुत सेवा मिळविण्यासाठी महापालिकेत यावे लागते. पंरतू मनपा अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन कामानिमित्त विविध ठिकाणी स्थळपाहणी, कार्यालयीन बैठका आदीकारणास्तव कार्यालयात जागेवर उपस्थित नसतात. त्यामुळे अधिकारी व नागरीकांमध्ये कुठलाही ताळमेळ, संवाद होऊ शकत नाही. नागरीकांना लहान लहान कामांसाठी 4 ते 5 वेळा किंवा त्याहून अधिक वेळा मनपात हेलपाटे मारावे लागतात. यामुळे नागरीकांमध्ये प्रचंड नाराजीचा सुरु दिसून येतो.