मुंबई : मुंबई शहराचा पुढील 20 वर्षांच्या विकास आराखड्यावर सोमवारी रात्री उशिरापर्यंत महापालिका सभागृहात सर्वसाधारण सभेत चर्चा सुरू होती. 15 दिवसांपूर्वी महापालिकेने सर्व नगरसेवकांकडून यावर सूचना व हरकती मागवल्या होत्या. तसेच राज्यशासनाने हा विकास आराखडा मंजुरीसाठी महापालिकेला 31 जुलै ही अंतिम मुदत दिली होती. त्यानुसार त्यावर सविस्तर चर्चा घेण्यात आली. दरम्यान कोणत्या जागेवर आरक्षण असावे अथवा नसावे, कोणत्या ठिकाणी चुकीचे आरक्षण देण्यात आले यावर नगरसेवकांनी दिवसभर चर्चा केली.
सायंकाळपर्यंत गटनेत्यांची भाषणे झाली नाही, ती रात्री उशिरापर्यंत होणार होती. दरम्यान मेट्रो-3चे कारशेड हे आरे वसाहतीमध्ये उभारण्यासंबंधी राज्यशासन आग्रही आहे. त्याला शिवसेनेने विरोध केला आहे. त्याचा विकास आराखड्यात समावेश असू नये, अशी भूमिका याआधीच शिवसेनेने मांडली होती. मात्र सरकारने त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत आतापासून आरेत मेट्रो भवन, कारशेड उभारण्याची चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे यावर आजच्या बैठकीत रात्री उशिरा भाजप-शिवसेनेमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान हा विकास आराखडा महापालिकेत मंजूर होऊन तो सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. तेथे त्यावर सुधारणा करून 2018 पासून तो अंमलात आणण्यात येणार आहे.