31 जुनपुर्वी कर कसा भरणार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आगाऊ मालमत्ता कर भरणार्यांना सामान्य करात सूट दिली जाते. ही सवलत 10 टक्के असून याचा मिळकत धारकांना काहीच फायदा होत नाही. मिळकत धारकांना देण्यात येणारी बिलांची छपाई अजून झाली नाही. ही बाब नुकतीच उघड झाली आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांना या सवलतींचा लाभ घेता येत नाही. दिरंगाईमुळे कर सवलत योजना ‘मृगजळ’ ठरत असल्याची टीका शिवसेनेचे स्थायी समिती सदस्य अमित गावडे यांनी केली.
विविध सवलतींचा माहिती रेडिओवर
महापालिकेतर्फे 2018-19 या आर्थिक वर्षात आगाऊ मिळकत कराचा भरणा करणार्यांना विविध सवलती लागू केल्या आहेत. या सवलती, योजना, वसुली जनजागृती मोहिमेची माहिती मिळकतधारकांना आता ‘एफएम’ रेडिओवरुन मिळणार आहे. साउथ एशिया एफ.एम. लिमिटेड या कंपनीच्या रेड एफ.एम. व रिलायन्स ब्रॉडकास्ट कंपनीच्या बिग एफ. एम या खासगी आणि प्रसार भारती (101) या शासकीय रेडिओ चॅनेलवरुन संपुर्ण जून महिन्यात कर सवलीतींची माहिती मिळकतधारकांना देण्यात येणार आहे. यासाठी नऊ लाख 34 हजार 560 रुपयांचा खर्चाला मान्यता देण्याचा विषय स्थायी समितीसमोर होता.
नागरिकांना सवलत कशी मिळणार
या मुद्यावर बोलताना अमित गावडे म्हणाले की, महापालिकेने 2018-19 या आर्थिक वर्षात मिळकतधारकांना विविध सवलती जाहीर केल्या आहेत. थकबाकीसह दोन्ही सहामाहीच्या बिलांची रक्कम 30 जूनपर्यंत एक रकमी भरल्यास मिळकतधारकांना सामान्य करात सवलत दिली जाणार आहे. परंतु, मे महिना संपत आला तरी बिलांची छपाई अद्यापही झाली नाही. महापालिका बिलांची छपाई कधी करणार आहे, मिळकतधारकांना बीले कधी वाटली जाणार, त्यानंतर मिळकतधारक कराचा कधी भरणा करणार, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे मिळकत धारकांना सवलतीचा लाभ मिळणार नाही. प्रशासनाने यापूर्वीच बिलांची छपाई करुन मिळकतधारकांना वाटणे गरजेचे होते. प्रशासनाच्या दप्तर दिरंगामुळे मिळकत धारक सवलतींपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
जून महिन्यात विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु होत आहेत. त्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांचा शाळेची फी भरावा लागणार आहेत. त्यामुळे यापूर्वीच बिलांची छपाई करुन वाटली असती तर मिळकत धारकांना एकरकमी कराचा भरणा केला असता. प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे नागरिकांना या सवलतीचा लाभ घेता येत नाही. ही योजना फसवी असल्याची भावना मिळकत धारकांची होत आहे, अशी टीकाही गावडे यांनी केली. कर संकलन विभागाच्या प्रशासन अधिकारी रेखा गाडेकर म्हणाले, बिलांची छपाई अंतिम टप्यात आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात बिलांचे वाटप करण्यात येईल.