महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेतही सत्तांतराच्या हालचाली
काँग्रेस,राष्ट्रवादी, सेनेच्या सदस्यांनी घेतली खडसेंची भेट
जळगाव – राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न जळगाव जिल्ह्यातही लागू होत आहे. महापालिकेत भाजपाला सत्तेतून बाहेर काढत खडसेंनी मोठा धक्का दिला होता. आता जिल्हा परिषदेतही भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी राजकीय हालचालींना सुरवात झाली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी आज राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे समीकरण जुळून आले. हेच समीकरण आता राज्यातील बहुतांश महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये जुळवुन भाजपाला दे धक्का दिला जात आहे. गेल्या १८ मार्च रोजी जळगाव शहर महापालिकेत भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष असूनही त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील या त्रिमुर्तींनी महापालिकेतील सत्तांतराची मुहूर्तमेढ रोवली होती.
आता मोर्चा जिल्हा परिषदेकडे
महापालिकेनंतर खडसेंनी मोर्चा जिल्हा परिषदेकडे वळविला आहे. महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही सत्तांतर होऊ शकते. त्या अनुषंगाने आज काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे, राष्टवादीचे गटनेते शशीकांत साळुंखे, शिवसेनचे गटनेते रावसाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपगटनेते रविंद्र पाटील यांनी एकनाथराव खडसे यांची मुक्ताई या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी माजी आ.गुरुमुख जगवाणी,अशोक लाडवंजारी,अशोक पाटील(रा.काँ.जिल्हा सरचिटणीस), सुनील माळी, डॉ. अभिषेक ठाकुर, गोटु चौधरी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा परिषदेतील सत्तांतराविषयी चर्चा झाली.
जिल्हा परिषदेतील राजकीय स्थिती
जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल लक्षात घेता बहुमतासाठी ३३ ही मॅजिक फिगर आहे. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे प्रत्येकी एक सदस्याच्या बळावर भाजपाची जिल्हा परिषदेत सत्ता आहे. यात भाजपाचे ३२ सदस्य आहेत. तर या ३२ मध्येही एकनाथराव खडसे यांचे ११ समर्थक आहेत. हे समर्थक फुटल्यास जिल्हा परिषदेतही भाजपाची सत्ता जाऊ शकते. दरम्यान तुर्तास तरी प्राथमिक चर्चा झाली असुन लवकरच महाविकास आघाडी पॅटर्नची जिल्हा परिषदेतही अंमलबजावणी होणार आहे.
नाथाभाऊंचा फरक कुठे पडतो हे दाखवू
नाथाभाऊ पक्षातून गेले तरी काही फरक पडत नाही असे अनेकजण म्हणतात. पण नाथाभाऊचा फरक कुठे कुठे पडतो हे दाखवुन देणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी ‘दै. जनशक्ती’शी बोलतांना सांगितले. जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्रभैय्यांचा फोन होता. त्यानुसार काँग्रेस, सेना आणि आमच्या पक्षाच्या सदस्यांशी आज प्राथमिक बोलणी झाली आहे. त्याला लवकरच अंतीम स्वरूप दिले जाईल असेही खडसे म्हणाले.